
शिक्षणनगरीला अमली पदार्थांचा विळखा
खारघर, ता. १ (बातमीदार) : पुणेनंतर एज्युकेशन हब म्हणून नावलौकिक असलेल्या खारघर शहरात पन्नासहून अधिक खासगी शाळा, तर दहाहून अधिक महाविद्यालये व इन्स्टिट्यूट आहेत. या परिसरात जवळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून शहरातील अनेक भागात गांजा, चरस आणि ई-सिगारेटची राजरोसपणे सुरू असलेली विक्री धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
खारघरमध्ये बार बंद करण्यासाठी संघर्ष समितीच्या झालेल्या बैठकीत उपस्थित राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरात चरस, गांजा आणि ई-सिगारेट मोठ्या प्रमाणात विक्री असल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता. तसेच माध्यमिक ते महाविद्यालयीन विद्यार्थी या नशेच्या आहारी गेले असून खारघरमध्ये खुलेआम गांजा तसेच बहुतांश पान टपरीवर ई-सिगारेट विक्री होत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या विषयी नशामुक्ती आणि मानसोपचार तज्ज्ञांकडे संपर्क साधला असता खारघर परिसरातील काही माध्यमिक ते महाविद्यालयीन विद्यार्थी चरस, गांजा, कोकिन आणि दारूच्या बळी पडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शिकवणी वर्ग असलेल्या ठिकाणी नशा करण्यासाठीचे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्यामुळे शालेय मुलांच्या जीवनाशी खेळ केला जात आहे. एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेटचे प्रमाण वाढले असून पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.
----------------------------------
कौटुंबिक वादात भर
महाविद्यालयीन विद्यार्थी एकमेकांचे पाहून ग्रुपमध्ये बिअर, गांजाचे फॅशन म्हणून सेवन करतात. पुढे नशेच्या आहारी गेल्यावर कोकेन ब्राऊन शुगरच्या आहारी जातात. अशा मुलांमध्ये अनेकदा नशा करण्यासाठी काही मिळाले नाही तर चिडचिडेपणा निर्माण होतो. तसेच कौटुंबिक वादासोबतच शालेय जीवनावरही परिणाम होतो.
---------------------------------
कारवाईत सातत्य नसल्याने प्रोत्साहन
गेल्या वर्षी खारघरमध्ये (मेथ्यॉक्युलॉन पावडर) नामक अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या समद नसीबखान शेख (२६) आणि प्रशांत वराट (२३) या दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल २ कोटी १० लाख रुपये किमतीचे २ किलो १०० ग्रॅम वजनाचे एमडी पदार्थ जप्त करण्यात आले होते. पण या कारवाईनंतर आजतागायत शहरात विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
-------------------------
खारघरमध्ये गांजा सहज उपलब्ध होत असून त्यात १५ ते २२ वयोगटातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्याच्या आहारी जात आहेत. तसेच ई-सिगारेटचे सेवन देखील घातक ठरणार आहे.
- डॉ. राहुल भातांबरे, नशा मुक्ती आणि मानसोपचार तज्ज्ञ
---------------------------
सद्यपरिस्थितीत अज्ञान आणि महाविद्यालयीन विद्यार्थी नशेच्या आहारी जात असून गांजा, चरस, दारू, तसेच उत्तेजक पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढत आहे. अमली पदार्थांचे प्रमाण वाढत असल्यामुळे याविषयी शाळेत जनजागृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे.
- डॉ. शुभांगी ढेरे, मानसोपचार तज्ज्ञ
-----------------------------
अमली पदार्थ विक्री होत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून द्यावे. तसेच त्यांनी थेट पोलिस ठाण्यात संपर्क केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल.
- संदीपान शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खारघर