तरुणांचा कल दूध व्यवसायाकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांचा कल दूध व्यवसायाकडे
तरुणांचा कल दूध व्यवसायाकडे

तरुणांचा कल दूध व्यवसायाकडे

sakal_logo
By

जव्हार, ता. ३ (बातमीदार) : जव्हार तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणारे बहुसंख्य शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. बेभरवशाचा पाऊस, निसर्गाचा लहरीपणा या सगळ्या समस्येने या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला होता; परंतु यातून मार्ग काढणे गरजेचे हे लक्षात आल्यानंतर तरुण शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाला पसंती देऊन यातून अर्थार्जन करायला सुरुवात केली आहे.
पशुधनाच्या खाद्य किमतीत भरमसाट वाढ, दूध विकून मिळणारा तुटपुंजा मोबदला, त्यामुळे पारंपरिक जोडव्यवसाय शेतकऱ्यांनी बंद केला होता; परंतु आता दुधाला चांगला भाव मिळत असल्याने जव्हार तालुक्यातील शेतकरी पुन्हा या व्यवसायाकडे वळत आहेत. वर्षभरापूर्वी ५० रुपये लिटर दराने विक्री होणारे म्हशीचे दूध सध्या ६० ते ८० रुपयांवर पोहचले आहे. शिवाय संपूर्ण जव्हार तालुक्यातून जवळपास दोन हजार लिटर दूध उपलब्ध होत असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन कार्यालयातून प्राप्त झाली आहे. त्यामुळे दुग्धव्यावसायिक तरुण शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.
तालुक्यातील न्याहाळे, साकुर, डोंगर पाडा, वनवासी, पिंपळ शेत आदी परिसरातील तरुण शेतकरी पारंपरिक जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतात व शहरातील नागरिकांना दूध पुरवतात. सध्या दुधाच्या किमतीत वाढ झाल्याने पुन्हा या व्यवसायाने गती प्राप्त केली आहे. म्हणूनच या भागातील तरुण शेतकरी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण घेऊन जातिवंत गाई व म्हशी शासकीय योजनेच्या अनुदानरूपात खरेदी करून चांगल्या प्रकारे दुग्धव्यवसाय करून आपली प्रगती साधत आहेत.

...................................

फायदेशीर जोडधंदा
मागील काही दिवसांपासून दुधाच्या किमतीत वाढ होत असून, सध्या म्हशीचे दूध ६० ते ८० रुपये लिटर या दराने गावातील डेअरीवर संकलित केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पारंपरिक दूध व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. अनेक अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकरी पुन्हा या पारंपरिक व्यवसायाकडे वळत आहेत.

.................................
कोरोना काळात दुग्धव्यवसाय करणे मोठे हलाखीचे झाले होते. शिवाय या व्यवसायाकरिता लागणारा व्यवस्थापन खर्चदेखील अधिक प्रमाणात होत होता. त्यातून दुधाकरिता मिळणारा भाव कमी असल्याने खर्चदेखील भागत नव्हता. आता दुधाच्या किमतीत वाढ झाल्याने आणि जातिवंत जनावरे उपलब्ध झाल्याने दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली आहे.
- उमेश गोविंद, दुग्धव्यावसायिक, जव्हार