
मिरा-भाईंदरमध्ये रंगणार कला महोत्सव
भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मिरा भाईंदरमध्ये डिसेंबर महिन्यात दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रताप सरनाईक फाऊंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ९ ते १२ डिसेंबरदरम्यान या आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, कवी कुमार विश्वास हे या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांची सांस्कृतिक गरज पूर्ण करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी पाच वर्षांपूर्वी मिरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हलची सुरुवात केली. कोरोना काळात त्यात खंड पडला होता. भाईंदर पूर्व येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान या ठिकाणी हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. चित्र प्रदर्शन, विविध कला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन असणार आहे. देश-विदेशातील प्रसिद्ध चित्रकारांची जुनी चित्रे या प्रदर्शनात पाहता येणार असून चित्र प्रदर्शनाचे एक मोठे दालन असेल. तसेच लहान मुलासाठी ‘गेम झोन’, खाद्यप्रेमींसाठी फूड स्टॉल असणार आहेत. कल्चरल ॲक्टिव्हिटी, फन फेयर, सेल्फी पॉईंटसह अनेक आकर्षक कला-संस्कृतीशी निगडित गोष्टी या महोत्सवात पाहायला मिळतील. तसेच मूर्तिकलेचाही सर्वाना परिचय व्हावा म्हणून मूर्तिकार स्वतः येऊन मूर्ती कलेचे प्रदर्शन घडवणार आहेत. महोत्सवाला दररोज किमान ६० ते ७० हजार नागरिक भेट देतील अशी अपेक्षा आहे. हा महोत्सव पूर्णपणे मोफत असणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
.....
प्रसिद्ध गायक, कवींची मैफील
महोत्सवाचे आकर्षण असलेले देश-विदेशातील सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या गाण्यांचा कार्यक्रम महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवार, ९ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम शनिवार, १० डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता, राजस्थान व गुजरातमध्ये प्रसिद्ध असलेले गायक छोटू सिंग रावणा व सोनू सिसोदिया यांच्या गाण्यांचा कार्यक्रम रविवार, ११ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता, तर सुप्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांचा ‘इंडियन हिंदी पोएट’ हा कार्यक्रम १२ डिसेंबरला सायंकाळी होणार असून या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे.