शहापूर तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू
शहापूर तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू

शहापूर तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू

sakal_logo
By

सकाळ इम्पॅक्ट
खर्डी, ता. १ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन १ डिसेंबर रोजी दै. सकाळमध्ये ‘कवडीमोल दराने भाताची विक्री; शहापूर तालुक्यात खरेदी केंद्रे सुरु न झाल्याने शेतकरी संकटात’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल त्याच दिवशी घेऊन आदिवासी विकास महामंडळाने घेऊन पळशीन सोसायटीच्या वतीने खर्डी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोडावूनमध्ये भात खरेदी केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मांडे यांच्याहस्ते शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

भात खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांना आर्थिक गरजेमुळे ९०० ते एक हजार इतक्या कमी भावात भात विकावे लागत होते; परंतु आता भात खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मरगळ झटकून आनंद व्यक्त केला. यावेळी पळशीन आदिवासी विविध सहकारी संस्थेचे खर्डी येथील भात खरेदी केंद्राचे उदघाटन संस्थेचे उपव्यवस्थापक तुकाराम कोर, सचिव भरत घनघाव, संचालक त्र्यंबक डोंगरे, नामदेव दुभेले, प्रकाश कोर, अंकुश कोर, रमेश दुभेले आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदलेल्या कागदपत्रासहित खरेदी केंद्रावर आपला भात घेऊन यावे, असे आवाहन भरत घनघाव यांनी केले आहे.

.....................................
कमिशन बाकी असल्याने संस्था अडचणीत
शहापूर तालुक्यातील आटगाव, पळशीण, डोळखांब, मुगाव व सापगाव येथे आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने भात खरेदी करणारी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे गेल्या चार वर्षांपासून ६४ लाखांचे कमिशन बाकी असल्याने संस्था आर्थिक अडचणीत आल्या असल्याची नाराजी संचालक त्र्यंबक डोंगरे यांनी यावेळी व्यक्त केली.