
शेतकऱ्यांच्या श्रमदानातून साकारला वनराई बंधारा
विक्रमगड, ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील वसुरी ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या माले-चिंचपाडा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. हा वनराई बंधारा सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या घेऊन त्या गोणीमध्ये माती भरून त्या गोणींच्या मदतीने वनराई बंधारा बांधण्यात आला. या भागात पावसाळा संपला की पाण्याची टंचाई निर्माण होते. यावर कुठे तरी मात व्हावी, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना समोर ठेवून एकत्र येऊन श्रमदानातून हा वनराई बंधारा बांधण्याचा छोटासा प्रयत्न केला असल्याचे माले-चिंचपाडा येथील शेतकऱ्यांनी सांगितले; तर पाणी ही काळजी गरज आहे व त्याचा योग्य वापर केला पाहिजे, असे मत वसुरी ग्रुप ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच स्वाती सहारे यांनी व्यक्त केले. हा बंधारा बाधण्यासाठी गावातील शेतकरी, कृषी अधिकारी आर. यू. ईभाड, प्रभाकर सांबर, आर. एस. बुंधे यांच्या माध्यमातून सहकार्य करण्यात आले.