तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान धुळ खात पडून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान धुळ खात पडून
तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान धुळ खात पडून

तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान धुळ खात पडून

sakal_logo
By

वाडा, ता. १ (बातमीदार) : तालुक्याचे तहसीलदार यांचे शासकीय निवासस्थान गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आला होता, मात्र दुरुस्तीनंतरही ते राहात नसल्याने शासकीय निवासस्थान धूळ खात पडून आहे, पण त्यांचा मुक्काम कल्याणला असल्याची चर्चा नागरिकांत आहे.
वाडा तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान आहे. या निवासस्थानात तत्कालीन तहसीलदार राहत होते. मात्र तहसीलदार उद्धव कदम यांनी वाडा तालुक्याचा कारभार हाती घेतल्यापासून ते शासकीय निवासस्थानात राहत नसून ते कल्याणवरून ये-जा करीत असतात. गेल्या दोन वर्षांपूर्वी शासकीय निवासस्थानाची दुरुस्ती करण्यात आली असून लाखो रुपये या दुरुस्तीवर खर्च करण्यात आला आहे. मात्र दुरुस्ती झाल्यापासून हे निवासस्थान बंद आहे. तालुक्याचे पालक या नात्याने तहसीलदारांनी वाडा या मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक असे अनेक अधिकारी वाड्यामध्येच राहत असून फक्त याला अपवाद तहसीलदार ठरत आहेत.
तालुक्याचे मुख्य अधिकारी म्हणून तहसीलदारांकडे पाहिले जाते. एखादी आपत्कालीन घटना, नैसर्गिक घटना, पूरपरिस्थिती, भूकंप, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अशा वेळी तहसीलदारांचे आदेश सर्वोच्च मानले जातात. मात्र अशा वेळी तहसीलदार तालुक्यात उपस्थित नसल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तहसीलदारांनी वाडा शहरात एक फ्लॅट भाड्याने घेऊन मी येथे राहत असल्याचे दाखवत आहेत, मात्र ते कल्याणवरून दररोज ये-जा करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
यासंदर्भात तहसीलदार उद्धव कदम यांच्या कार्यालयात गेले असता ते कार्यालयात नसून सुट्टीवर असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यांना दूरध्वनीवर संपर्क साधला असता तो बंद होता.


कोट
तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान नादुरुस्त असल्याने ते दुरुस्त करून घेण्यात आले आहे. ते वाडा येथेच फ्लॅटमध्ये राहत असून सुट्टीच्या दिवशी ते कल्याण येथे जात असतात.
- सुनील लहांगे, नायब तहसीलदार