
अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रूपीकरण
खारघर, ता. १ (बातमीदार) : शहरात काही दिवसांपासून अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट सुरू आहे. ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावले जात असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या होर्डिंग्जकडे तर महापालिका दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
खारघर वसाहतीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या होर्डिंग्ज, बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. सिग्नल, मुख्य चौक, सर्कल, पथदिवे, झाडावर बॅनर, होर्डिंग्ज लावल्यामुळे सार्वजनिक रहदारीला अडथळा ठरू लागली आहे. तळोजा वसाहतीत गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू असल्यामुळे खारघरमधील उत्सव चौककडून सेंट्रल पार्क, टाटा हॉस्पिटलमार्गे तळोजा वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकातील पथदिव्यांच्या खांबावरही त्याचे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहे. याशिवाय शिल्प चौक, तीन माकडे आणि वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर होर्डिंग्ज, बॅनर मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः राजकीय कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग्जची नियमावली पायदळी तुडवली आहे. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर काढून खारघर बॅनरमुक्त करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे असताना विनापरवाना बॅनर, होर्डिंग्ज लावणाऱ्या राजकीय व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतर कोणत्याही राजकीय व्यक्तीने विनापरवाना बॅनर लावले नाही; मात्र शिंदे यांची बदली होताच राजकीय कार्यकर्ते चौक, रस्त्यांच्या दर्शनी भागात अनधिकृत बॅनरबाजी करून शहर विद्रूप करत आहेत.
खारघर परिसरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावलेली आहेत. अनधिकृत लावण्यात आलेले होर्डिंग्ज दोन दिवसांत काढले जाईल.
- जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर