रुग्णालयाच्या मार्गातील वृक्षांचा अडसर दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयाच्या मार्गातील वृक्षांचा अडसर दूर
रुग्णालयाच्या मार्गातील वृक्षांचा अडसर दूर

रुग्णालयाच्या मार्गातील वृक्षांचा अडसर दूर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून, सार्वजनिक विभागाकडूनदेखील या रुग्णालयाच्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील ७१ वृक्षांचा अडसर दूर होणार आहे. दोन वृक्ष पुरातन स्वरूपात मोडत असल्याने त्या वृक्षांचे काय करायचे, या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारच्या वृक्ष कमिटीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मल्‍टिस्पेशालिटी रुग्‍णालय होण्याच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर होणार आहे.

ठाणे जिल्हा रुग्णालयाची सध्याची क्षमता ३०० खाटांची असून, जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण रुग्णसंख्या दाखल होण्याचा वेग पाहता या जागी ५७४ खाटांचे सहा मजली मल्‍टिस्पेशालिटी रुग्‍णालय उभारण्याला १३ जून २०१९ साली ३१४.११ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती. याठिकाणी ९०० खाटांचे १० मजली रुग्णालय आणि १० परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृहाचा आराखडा तयार करण्यात येऊन या संकल्पचित्राला ९ एप्रिल २०२१ रोजी मान्यता मिळाली असल्याचे कार्यकारी अभियंता पाटील म्हणाले. १३ जून २०१९ पासून सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाचा सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्‍प्यात आला आहे. येथील अनेक विभाग नवीन वास्तूमध्‍ये हलविण्यात आले आहेत. तसेच विविध स्वरूपाच्या परवानग्या घेण्याचे काम युद्धपातळीवर आले आहे. त्यानुसार आता महापालिकेकडे येथे बाधित होणाऱ्या ७१ वृक्षांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यातील २२ वृक्ष वाचणार असून, उर्वरित ४७ वृक्ष तोडले जाणार आहेत. त्यानुसार पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारच्‍या परवानगीची प्रतीक्षा
वावळा आणि सोनमोहर हे ५० वर्षे जुने मोठे वृक्ष आहेत. त्यामुळे ते पुरातन वृक्ष म्हणून ओळखले जातात. या वृक्षांचे काय करायचे, असा पेच सध्या निर्माण झाला आहे. त्याचे पुनर्वसन करायचे किंवा दुसऱ्या ठिकाणी ते हलवायचे या बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार पालिका या दोन वर्षांचा निर्णय राज्य सरकारकडून आलेल्या परवानगीनंतर घेणार आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मल्‍टिस्पेशालिटी रुग्‍णालय होण्याच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.