
अन्यायाविरोधात लढण्याची महिला संघटनांमध्ये ताकद!
भिवंडी, ता. १ (बातमीदार) : महिलांच्या सर्व प्रश्नांवर भाजप महिला मोर्चा काम करणार आहे. विविध योजनांद्वारे त्यांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून अन्यायाविरोधात लढण्याची ताकद महिला संघटनांमध्ये आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. भिवंडी येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी, आमदार महेश चौघुले, महिला मोर्चा अध्यक्षा ममता परमाणी, नगरसेवक सुमित पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते.
मूल पोटात असतानाच त्याच्यासाठी शासकीय योजना सुरू होतात, त्यांची माहिती महिला पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन सांगणे गरजेचे आहे, असे सांगत पक्षात काम करताना सख्ख्या आणि पक्क्या मैत्रिणी बनवू या, राजकारणात मी पणाला महत्त्व नाही, तर आपल्या एकत्रित प्रयत्नांना महत्त्व आहे हे ध्यानात ठेवून अन्याय-अत्याचाराविरोधात लढत असताना वेळ आली तर आक्रमक व्हायचे आहे. बलात्कार, विनयभंग ही समाजातील विकृती आहे. बलात्कार, अत्याचार, विनयभंग एका दिवसात बंद होणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकार महिला, मुली सुरक्षित राहतील यासाठी काम करीत असल्याने महिलांनी निर्भय होऊन पुढे यावे, असे प्रतिपादन चित्रा वाघ यांनी केले.
...
लव जिहादचा कायदा हवा...
१८ वर्षांच्या खालील मुलींना पळवून नेले जाते, लग्नाच्या भूलथापा देऊन असे प्रकार घडतात. अशा वेळी मुलींसह त्यांच्या परिवाराला कायद्याचे संरक्षण नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशप्रमाणे ‘लव जिहाद’ कायदा महाराष्ट्रात हवा, अशी मागणी सरकारकडे आम्ही करीत आहोत.