
श्रमजीवी संघटनेचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
अंबरनाथ, ता. १ (बातमीदार ) : गायरान आणि शासकीय जागेवरील निवासी धारकांना बजावण्यात आलेल्या नोटीस मागे घ्याव्यात, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेमार्फत अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता. श्रमजीवी संघटनेचे राज्य सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके आणि राजेश चन्ने, तालुका अध्यक्ष राजेंद्र म्हस्कळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
शासकीय आणि गायरान जमिनीवर राहणाऱ्या झोपडी अथवा घरधारकांना त्यांच्या घराखालील जागा नावावर करून सनद वाटप करावी, सर्व आदिवासी कुटुंबांना घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करावे, सर्व आदिवासी कुटुंबांना मोफत वीज मीटर द्यावेत, त्यांना घरकुल योजना आणि आधार कार्ड उपलब्ध करून द्यावीत, आदिवासी कुटुंबांची वस्तिस्थाने निश्चित करून त्यांना पट्टे वाटप करावे, पिण्याच्या पाण्याची गैरसोय असणाऱ्या वस्त्यांना पाण्याची व्यवस्था करून द्यावी, त्याचप्रमाणे देवळोली, सावरे, शिरवली, ढवळेगाव, देवीचा पाडा, शेकरपाडा या ठिकाणी अंतर्गत रस्ते आणि स्वच्छतागृहे द्यावीत, यांसह अन्य मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने गुरुवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आणून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
नायब तहसीलदार बंडू जाधव यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले आणि चर्चा केली. १४ डिसेंबर रोजी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रशासनाने बोलावल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.