
मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून २८३ कोटी रुपयांची कमाई
मुंबई, ता. १ : मध्य रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिमे’अंतर्गत गेल्या आठ महिन्यांत भंगार विक्रीतून २८३ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. मध्य रेल्वेच्या इतिहासात आठ महिन्यांच्या कालावधीतील हा सर्वाधिक महसूल असल्याचा दावा करण्यात आला आहे. मध्य रेल्वेला आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते नोव्हेंबर) यादरम्यान भंगार विक्रीतून २८३.६१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. हा महसूल नोव्हेंबर २०२२ पर्यंतच्या २१८.९२ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा २९.५४ टक्क्यांनी जास्त आहे. तसेच एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतील आतापर्यंतची सर्वाधिक भंगार विक्री आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील भंगार विक्री २८०.१८ कोटी रुपये होती. भंगाराच्या विल्हेवाटीने केवळ महसूलच मिळत नाही; तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत झाली आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले.