
हेरिटेज गल्लीत कर्नाक उड्डाणपुलाचा शेवटचा दगड
मुंबई, ता. १ : मध्य रेल्वे मार्गावरील दीडशे वर्षांहून अधिक जुना कर्नाक उड्डाणपूल काही दिवसांपूर्वीच पाडण्यात आला. आता राडारोडा उचलण्यात आला असला तरी मध्य रेल्वेने पुलाचा इतिहास सांगणारा दगड जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुलाचा इतिहास पर्यटकांना समजावा म्हणून सीएसएमटीच्या हेरिटेज गल्लीमध्ये तो ठेवण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वेस्थानकांदरम्यान कर्नाक पुलाची निर्मिती १८६८ मध्ये झाली. त्यास १५४ वर्षे पूर्ण झाली. पूल धोकादायक झाल्याने १९ ते २० नोव्हेंबर रोजी २७ तासांचा जम्बोब्लॉक घेऊन तो पाडण्यात आला. पुलाच्या दोन्ही टोकांना त्याचा इतिहास सांगणारे बेसाल्ट दगड ठेवण्यात आले होते. त्या दगडांवर कर्नाक पुलाच्या बांधकामाचे वर्ष आणि नाव मराठी, गुजराती, हिंदी व इंग्रजीत लिहिले आहे. मध्य रेल्वेने सर्वधिक जुन्या पुलाचा इतिहास जनतेला समजावा म्हणून सहाही दगड जतन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ते पी’डिमेलो रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्व प्रवेश) मधील हेरिटेज गल्लीत ठेवण्यात आले आहेत.
काय आहे हेरिटेज गल्ली
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १८ जवळ जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून हेरिटेज गल्ली तयार करण्यात आली आहे. त्यात मध्य रेल्वेचा ऐतिहासिक वारसा असलेले इंजिन, क्रेन आणि रेल्वेच्या प्रिंट मशीनसह अनेक वस्तू प्रवाशांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
- हेरिटेज गल्लीत आता कर्नाक उड्डाणपुलाचा इतिहास सांगणारे सहा दगड ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना मध्य रेल्वेच्या ऐतिहासिक पाऊलखुणा हेरिटेज गल्लीत पाहायला मिळतील.