
डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यासाठी उपोषण
शहापूर, ता. २ (बातमीदार) : तालुक्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असावे, यासाठी गेली ३० वर्षे तालुक्यातील बौद्ध समाज शासनाकडे पाठपुरावा करत आहे. शहापूर शहरातील डॉ. आंबेडकर चौक येथील स्तंभावर डॉ. आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्याची परवानगी मिळावी, यासाठी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड या महिला कार्यकर्त्यांसह आज (ता. २) दुपारी उपोषणाला बसल्या आहेत. चौकातील स्तंभावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हाधिकारी ठाणे व शहापूर नगरपंचायत यांना पत्र देऊन केली आहे. शहापूर शहराच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असावे, या करिता तालुक्यातील आंबेडकरी जनतेने अनेक आंदोलने केली; परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचे ज्योती गायकवाड यांनी म्हटले.