
पालघर जिल्ह्यात ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान सुरू
पालघर, ता. २ (बातमीदार) : जल जीवन मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ व शाश्वत पिण्याचे पाणी नियमित पुरवठा करण्यासाठी १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात या अभियानाचा शुभांरभ आज (ता. २) दिशा समितीमध्ये खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार सुनील भुसारा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी रवींद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
जिह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची या उपक्रमांतर्गत जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार असून त्याचे अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात ग्रामीण भागातील सार्वजनिक स्रोतांचे जिओटॅग करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महसूल गावनिहाय पाच महिलांना प्रशिक्षित करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाणी नमुन्याची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता जैविक पाणी तपासणी किट ग्रामपंचायत स्तरावर वितरित करण्यात आले आहे. या किटच्या माध्यमातून गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची पी. एच. फ्लोराईड, लोह, गढूळपणा, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, एकूण क्षारता, एकूण कठीणपणा, क्लोराईड, नायट्रेट आदी घटकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांनी दिली.
स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ सुरू झाले आहे. गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाल व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व गावातील दृष्यमान स्थितीचे स्वयं:मूल्यांकन अर्ज ई-ग्रामस्वराजच्या माध्यमातून १५ डिसेंबरपर्यंत भरावयाचा आहे, असे जिल्हा परिषदेमार्फत सांगण्यात आले आहे.