
४७ दुचाकीच्या सायलेन्सर फिरवला रोड रोलर
पनवेल, ता. २ (वार्ताहर) : पनवेल वाहतूक पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर जप्त केले आहेत. या मोहिमेदरम्यान ४७ सायलेन्सरवर शुक्रवारी (ता. २) सकाळी रोड रोलर चालवून ते नष्ट करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांनी केली.
अनेक चालक दुचाकी, बुलेट वाहनाला कंपनीकडून लावण्यात आलेले सायलेन्सर काढून कर्णकर्कश आणि कानठळ्या बसवणारे सायलेन्सर लावतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असल्याने त्याची दखल घेऊन पनवेल वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर लावण्यात आलेल्या दुचाकीवर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यासाठी पनवेल वाहतूक शाखेने परिसरात विशेष मोहीम राबवून महिन्याभरात ४७ दुचाकी वाहनाचे सायलेन्सर जप्त केले आहेत. त्यावर आज सकाळी पनवेल येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले.
मोठ्या आवाजातील सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने ते काढून जप्त करण्याची मोहीम सुरू आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून ज्यांनी आपल्या बुलेटला मॉडिफाइड सायलेन्सर लावून घेतले आहेत, त्यांनी ते स्वत:हून काढून टाकावेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- संजय नाळे, पोलिस निरीक्षक
पनवेल वाहतूक विभाग