सिद्धिविनायक मंदिरात गैरकारभार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धिविनायक मंदिरात गैरकारभार!
सिद्धिविनायक मंदिरात गैरकारभार!

सिद्धिविनायक मंदिरात गैरकारभार!

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. २ (बातमीदार) : प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात शिवभोजन थाळी, क्यू आर कोड, कोविड रीलिफ फंड, नोकर बढती, पाण्याचे टँकर यात गैरकारभार झाला असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सिद्धिविनायक न्यासाने आपली पारदर्शकता सिद्ध करावी, अशी मागणीही मनसेने केली असून, याबाबतची लेखी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असून १५ दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी शुक्रवारी (ता. २) पत्रकार परिषद घेत हे आरोप केले. सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी प्रत्येक खर्चाचा हिशेब भाविकांना देऊन आपली पारदर्शकता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना शिवभोजन केंद्र सुरू करण्यात यावे, असे पत्र सिद्धिविनायक न्यासाला देण्यात आले होते. स्वतः न्यास हे सहाय्य देऊ शकले असते; मात्र पायाभूत सुविधा नाही, असे कारण पुढे करत बांदेकर यांनी अर्थसाह्य देतो असे पत्र दिले. न्यासाने हा निर्णय परस्पर कसा घेतला, असा प्रश्व किल्लेदार यांनी केला.

‘क्यू आर’ कोडसाठी वर्षाला साडेतीन कोटी खर्च करण्यात आला. तसेच कोविड रिलीफ फंडाला ५ कोटी पाठवण्यात आले. या वेळी कोणताही ठराव करण्यात आला नाही. मोबाईल टॉयलेटसाठी मंदिराला ४३ लाख देणगी देण्यात आली; पण प्रत्यक्षात तिथे बांधकाम करून पक्के टॉयलेट बांधले गेले, असा आरोपही मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.
----

पूरग्रस्त गावांना १०० टँकर पाणी देण्यात आले. त्यासाठी दीड कोटी खर्च करण्यात आला. हे पाणी कोणत्या गावांना देण्यात आले याचा तपशील न्यासाने द्यावा. वरिष्ठांना डावलून नोकर बढती करण्यात आली. यात बोगस प्रमाणपत्रांचा वापर झाला, या संदर्भातील सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. सरकारने यावर गांभीर्याने विचार करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून विश्वस्त मंडळ बरखास्त करावे.
- यशवंत किल्लेदार, उपाध्यक्ष, मनसे

सिद्धिविनायक मंदिर न्यासामध्ये सर्व गोष्टी या विहित प्रक्रिया राबवून करण्यात येतात. त्यामुळे या कोणत्याही आरोपात अजिबात तथ्य नाही.
- आदेश बांदेकर, अध्यक्ष, सिद्धिविनायक न्यास