
नव्या वर्षात दिघ्यातून प्रवास
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पातील दिघा स्थानकाचे काम पूर्णत्वास आले असून येत्या ३१ डिसेंबरपर्यंत दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षात दिघा रेल्वे स्थानकातून प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच मिरा-भाईंदरमधील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांसदर्भात खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश कुमार गोयल यांची भेट घेतली. याप्रसंगी रेल्वे प्रशासन आणि संबंधित महापालिकांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान खासदार राजन विचारे यांनी नवीन वर्षात दिघा रेल्वे स्थानक सुरू करण्याची मागणी केली. त्या वेळी मुख्य रेल्वे प्रबंधक गोयल यांनी ३१ डिसेंबरपर्यंत अथवा नवीन वर्षात दिघा रेल्वे स्थानक सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आल्याचे सांगितले. तसेच नवी मुंबईत रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सिडकोने विकसित केलेल्या सर्व रेल्वे स्थानकांवर सरकते जिने बसवण्यासाठी सिडकोमार्फत निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या सर्व रेल्वे स्थानकांत सरकते जिने आणि लिफ्टदेखील बसवण्याचे काम सुरू होणार असल्याबाबत मुख्य प्रबंधक गोयल यांनी माहिती दिल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.