
रेल्वे पादचारी पूल उड्डाणपुलाला जोडावा
अंबरनाथ, ता. ४ (बातमीदार) : अंबरनाथ रेल्वे फलाटावरील पादचारी पूल हुतात्मा चौकातून जाणाऱ्या उड्डाण पुलाला जोडावा, त्यामुळे कंपनीच्या बसमधून येणारे नोकरदार, आयटीआयचे विद्यार्थी तसेच शनिमंदिर आणि साई सेक्शनमधून येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग मिळू शकेल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते नीलेश पाताडे यांनी व्यक्त केला आहे.
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी दररोज हजारो नागरिक नोकरीनिमित्त शहरात येत असतात. अंबरनाथ रेल्वेस्थानकातून एमआयडीसीकडे जाण्यासाठी हुतात्मा चौकातून प्रवासी कंपनीची बस पकडतात. हुतात्मा चौकातून कंपन्यांच्या बस सोडण्याची सुरुवात झाल्यापासून वडवलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला आहे. पण हुतात्मा चौकातील कंपनीचा बस थांबा ते रेल्वेस्थानकापर्यंत प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी जीव धोक्यात घालून चालावे लागते. लोकलमधून उतरल्यावर रेल्वेचा पादचारी पूल चढून नंतर उड्डाण पुलाजवळील साईबाबा मंदिराशेजारील पायऱ्या चढाव्या लागतात, असे किमान दोन वेळा चढ-उतार करावे लागते. बहुतेक नोकरदार ही कसरत चुकवण्यासाठी जीव धोक्यात टाकून लोहमार्ग ओलांडतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरील पादचारी पूल पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला जोडण्याची मागणी पाताडे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.