कामवारी नदी स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामवारी नदी स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग हवा
कामवारी नदी स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग हवा

कामवारी नदी स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग हवा

sakal_logo
By

भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : भिवंडीतील वाढत्या शहरीकरण व नागरीकरणामुळे नद्यांचे प्रवाह कमी झाले आहेत. या कारणाने तसेच दिवसेंदिवस विविध मार्गांनी नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊन त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्यासाठी युद्धही होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यासाठी नदी स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग गरजेचा आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले.
राज्यातील व शहरातील नद्यांचे विविध प्रकारच्या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी आणि भविष्यातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमांतर्गत पालिकेत बैठक बोलावली होती. त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त दिवटे हे बोलत होते. पाणी म्हणजे जीवन आहे. हे जीवन सुसह्य व्हावे याकरिता नदी आणि पर्यावरण वाचवणे हे आपले प्रथम कर्तव्य असून त्याप्रती सर्वांनी प्रामाणिकपणे काम करणे काळाची गरज आहे; अन्यथा पुढील पिढी आपणास नक्कीच माफ करणार नाही. त्यामुळे जल है तो कल है या वाक्प्रचाराप्रमाणे नागरिकांनी नदीबचाव कार्यामध्ये प्रत्यक्ष जबाबदारी घेऊन सहभाग घ्यायला हवा, तरच निसर्ग व पर्यावरण राखले जाणार असल्याचेही दिवटे यांनी सांगितले.
याप्रसंगी स्नेहल दोंदे, ठाणे (जल प्रहरी सदस्य) यांनी भिवंडीतील कामवारी नदीबाबत स्लाईड शोद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच त्यावरील उपाययोजना सुचवल्या. या वेळी शहर अभियंता सुनील घोगे, एल. पी. गायकवाड, नगर रचना विभागाचे अधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी व संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.