अश्रु धुराची टेस्ट; नागरिकांच्या डोळ्यातून काढले पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अश्रु धुराची टेस्ट; नागरिकांच्या डोळ्यातून काढले पाणी
अश्रु धुराची टेस्ट; नागरिकांच्या डोळ्यातून काढले पाणी

अश्रु धुराची टेस्ट; नागरिकांच्या डोळ्यातून काढले पाणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : डोंबिवली पूर्व येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना शुक्रवारी सायंकाळी अचानक डोळे चुरचुरण्याचा त्रास जाणवू लागला. प्रदूषणामुळे त्रास होत असल्याचे नागरिकांना प्रथम वाटल्याने त्यांनी त्वरित डॉक्टरकडे धाव घेतली; मात्र शेजारीच असलेल्या आरपीएफ कॅम्पमध्ये अश्रूधुराची तपासणी करण्यात आली. हवेमुळे हा धूर नागरी वस्तीत आल्याने नागरिकांना त्रास झाला. हा धूर त्रासदायक नसल्याची माहिती या वेळी रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.
पूर्वेतील शेलार नाका परिसरात सायंकाळी ६.३० च्या आसपास नागरिकांना डोळे चुरचुरणे, श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला. डोंबिवली एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे अनेकदा नागरिकांना असे त्रास होत असल्याने प्रदूषणामुळे हा त्रास होत असल्याचा समज स्थानिक नागरिकांचा झाला. लहान मुलांनादेखील त्रास होत असल्याने नागरिकांनी घराची खिडक्या-दारे बंद करून घेतली. ज्यांना त्रास जास्त जाणवत होता, त्यांनी लगेच डॉक्टरकडे धाव घेतली. रामनगर पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांडभोर यांनी सांगितले, की या वस्तीशेजारी आरपीएफ बटालियन आहे. त्या ठिकाणी प्रशिक्षण सुरू असतानाच अश्रूधुराची तपासणी घेण्यात येत होती. जमिनीवर त्यांनी दोन कांड्या फोडल्या होत्या; मात्र हवा असल्याने त्याची काही मात्रा हवेत पसरून त्याचा बाजूच्या वस्तीतील नागरिकांना काही प्रमाणात त्रास झाला. हा धूर धोकादायक नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनदेखील त्यांनी या वेळी केले.