
वसईवासीयांचे पासपोर्टसाठीचे हेलपाटे थांबणार, ६ डिसेंबरला सेवा केंद्राचे उद्घाटन
विरार, ता. ३ (बातमीदार) : वसई तालुक्यातील नागरिकांना पासपोर्टसाठी मुंबई किंवा ठाणे येथे जावे लागत होते; परंतु आता मात्र वसईमध्येच पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन ६ डिसेंबरला होणार आहे.
वसई तालुक्यातून हजारो तरुण नोकरी, शिक्षणासाठी किंवा फिरण्यासाठी परदेशात जात असतात; परंतु वसईमध्ये पासपोर्ट कार्यालय नसल्याने त्यांना मुंबई आणि ठाण्याच्या फेऱ्या कराव्या लागत होत्या. त्यामुळे वसईमध्ये पासपोर्ट ऑफिस सुरू करावे, अशी मागणी वसईतील नागरिक आणि विविध राजकीय पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. या मागणीला आता यश आले असून ६ डिसेंबरला वसईमध्ये या कार्यालयाचे उद्घाटन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. राजेंद्र गवांडे आणि पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर उपस्थित राहणार आहेत.