
मुलभूत हक्क ही राज्यघटनेनी दिलेली मोठी देणगी
विरार, ता. ३ (बातमीदार) : भारतीय राज्यघटना ही देशातील लोकांना दिलेला बहुमूल्य दस्त असून मुलभूत हक्क ही लोकांना मिळालेली बहुमूल्य देणगी आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश- १ तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले. ते तालुका विधी सेवा समिती वसई आणि वसई वकील संघातर्फे राज्यघटना दिवस निमित्ताने आयोजत विशेष कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यघटनेच्या हस्तलिखितातील बारकावे उपस्थितांना समजावून सांगितले.
वसईत पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक वकिलांनी मार्गदर्शन केले. त्यात अॅड. नेपोलियन तुस्कानो यांनी राज्यघटना सुरुवातीला हिंदी व इंग्लिश या भाषांत लिहण्यात आली, ही राज्यघटना लिहिण्यासाठी किती पेन व शाई वापरण्यात आली आणि त्याबाबतची वैशिष्ट्ये सांगितली; तर अॅड. अजय मिश्रा यांनी राज्यघटना कधी तयार केली व त्यासाठी कोणाचे मोलाचे सहकार्य लाभले याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. वर्षा बिऱ्हाडे यांनी राज्यघटना कोणासाठी व का तयार करण्यात आली याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. ख्याती नागर यांनी राज्यघटनेबाबत विस्तृत अशी माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमासाठी न्या. एस. व्ही. खोंगल, आर. डी. देशपांडे, एस. आर. वडाली, आर. एच. नाथाणी, एन. के. पाटील, जी. जी. कांबळे, ए. व्ही. मुसळे, एम. ए. एम. जे. शेख, पी. पी. कुलकर्णी, एस. व्ही. हरगुडे, एस. एस. जयस्वाल तसेच अॅड. नोएल डाबरे, विल्यम फर्नांडिस, दिगंबर देसाई, उज्ज्वला डिसाल्वा, साधना धुरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सुधीर देशपांडे यांनी उद्देशिकेस पुष्पहार अर्पण करून त्यानंतर उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. नयन जैन व चेतन भोईर यांनी केले; तर कार्यक्रमाची सांगता अॅड. अल्तमश खान यांच्या विशेष शैलीतील आभार प्रदर्शनाने झाली.