
प्रेजेंट पाकिटांची मनाला भुरळ
कोमल गायकर ः घणसोली
कोणत्याही कार्यक्रमाला रिकाम्या हाती जाणे योग्य वाटत नाही. त्यामुळे अनेक जण विविध भेटवस्तू किंवा काहीजण पाकिटात पैसे टाकून देतात. ही पद्धत फार जुनी असली तरी त्यात आता वेगळेपण आले आहे. त्यामुळे बाजारात नवनवीन प्रकारच्या पाकिटांचा नवा ट्रेंड आला असून वाढदिवस, लग्नसोहळ्यांमध्ये मागणी वाढली आहे.
--------------------------
लग्नसराई सुरू झाली असल्यामुळे लग्न सोहळ्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू जोडप्यांसाठी घेऊन जातो, मात्र काही पाहुणे भेटवस्तू न नेता पैशांचे पाकीट देतात. हे पाकीटदेखील आता बाजारात आकर्षक प्रकारे पाहायला मिळत आहेत. लग्नात मोठमोठ्या भेटवस्तू येतात. मात्र अनेकांना काय घेऊ हे सुचत नाही किंवा आपण घेतलेली वस्तू अगोदरच कुणी घेतली असेल तर ती वस्तू रिपीट होऊ नये, या उद्देशाने अनेक जण प्रेझेंट पाकीटचा वापर करतात. अनेक पाहुणे मंडळी मनाला वाटेल तेवढी रक्कम या प्रेझेंट पाकीटमध्ये टाकतात. हे पाकीटही जोडप्याला आकर्षक वाटावे, यासाठी बाजारात आकर्षक भेटवस्तू पाहायला मिळत आहेत. पूर्वी फक्त एकाच आकारात पाकिटे उपलब्ध होती. मात्र, शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे पत्रव्यवहार होत होता. त्याप्रमाणे खलिता, हाताने हवा घालणारा पंखा, हॅन्ड बॅग्स, कलश, पुरुषाच्या शर्टचे आकार, तर महिलांच्या फ्रॉक, सफरचंदाच्या आकारात तर गोलाकार स्वरूपातदेखील विविध प्रकार पाहायला मिळत आहे.
------------------------
३००-३५० रुपयांमध्ये उपलब्ध
बाजारात आलेल्या नवनवीन प्रकारच्या प्रेझेंट पाकिटची किंमत ३००-३५० रुपये आहे; तर साधे मनी पाकीट ८०-९० रुपयांत उपलब्ध होत आहेत. या आकर्षक प्रकारांनी ग्राहकदेखील मोठ्या प्रमाणात पाकिटांकडे आकर्षित होत आहेत.
------------------------
लग्नसराई सुरू झाली आहे किंवा इतरही शुभकार्य असेल भेटवस्तू म्हणून काय घेऊन जावे, हा सर्वात मोठा प्रश्न असतो. प्रत्येकाला काय भेटवस्तू द्यावी, हे सुचत नाही म्हणून प्रेझेंट पाकीट देणे हा उत्तम पर्याय आहे.
- सुविधा गोवासी, ग्राहक, महिला
------------------------
प्रेझेंट पाकिटात नवनवीन प्रकार उपलब्ध झाल्याने ग्राहकांची मागणी वाढली आहे. तसेच लग्न सोहळे किंवा अन्य कौटुंबिक कार्यक्रमात रिटर्न गिफ्ट म्हणून नवा पर्याय उपलब्ध आहे.
- सुधीर गुप्ता, विक्रेता