
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक नियमांबाबत जनजागृती
मुंबई, ता. ३ ः राज्यातील महामार्गांवरील अपघात कमी करण्याच्या हेतूने वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी मुंबई-पुणेच्या दोन्ही महामार्गांवर रस्ता सुरक्षा कक्षांतर्गत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्याप्रमाणे १ डिसेंबरपासून जुन्या आणि नवीन मुंबई-पुणे महामार्गांवर महामार्ग पोलिस आणि परिवहन विभागाच्या वतीने वाहतुकीच्या नियमांचे बॅनर, पोस्टर्स लावून जनजागृती केली जात आहे. त्याशिवाय दैनंदिन या मोहिमेचा आढावा घेतला जात असून सहा महिन्यांत रस्ते वाहतुकीत सुधारणा होण्याचा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला आहे.
मोटार वाहन कायद्यांतर्गत येणाऱ्या वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी महामार्गांवर ठिकठिकाणी जनजागृतीचे फलक लावण्यात येत आहेत. महामार्गांच्या मध्य भागांमध्ये दर्शनी ठिकाणी सीटबेल्ट वापर, मद्य पिऊन वाहन न चालवणे, वेगावर नियंत्रण, मोबाईलचा वापर टाळण्यासंदर्भातील सूचना फलकांवर लिहिण्यात आल्या आहेत. असे फलक रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात येणार असून महामार्ग पोलिस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून महामार्गांवरील नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईसुद्धा केली जाणार आहे.
…
ब्लॅक स्पॉटवरील वाहतुकीवर लक्ष
द्रुतगती महामार्गांवरील रस्ता सुरक्षा कक्षाची ही मोहीम ३१ मेपर्यंत राबवली जाणार असून यामध्ये सर्वाधिक ब्लॅक स्पॉटवरील वाहतुकीवर लक्ष दिले जाणार आहे. इंटरसेप्टर वाहनांच्या साह्याने लेन कटिंग आणि भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवरसुद्धा कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय द्रुतगती महामार्गांवर अवैध पार्किंग करणाऱ्यांना आळा घालण्यात येणार असून दोन्ही टोलनाक्यांवर वाहतूक नियमांच्या उद्घोषणासुद्धा केल्या जाणार असल्याचे परिवहन उपायुक्त रस्ता सुरक्षा कक्ष तथा मुंबई सेंट्रलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले.