
कसाऱ्यात निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे फेडरेशनची स्थापना
खर्डी, ता. ५ (बातमीदार) : ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमन फेडरेशनने कसारा आणि आसपासच्या रेल्वे सेवानिवृत्तीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवृत्त रेल्वे फेडरेशनची स्थापना केली. कसारा येथे पार पडलेल्या बैठकीत सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी सुधाकर सोनवणे यांनी या वेळी जाहीर केले. या वेळी शंभरहून अधिक सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात आली.
मध्य आणि पश्चिम रेल्वे सेवेतून निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे सेवेतून निवृत्त झालेल्या दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना मेडिकल, निवृत्तिवेतन आणि पास मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेन्शन घेतेवेळी बँकेच्या अपुऱ्या सुविधांमुळे तासन् तास ताटकळत उभे राहावे लागते.
या वेळी फेडरेशनचे आर. के. सारस्वत, संपत कुमार, रवींद्र वासने, सुरेश गायकवाड, अब्दुल हाकीम, डी. एल. पवार, सुधाकर सोनवणे, विक्रम हिरे, शांताराम कदम, आनंदा बागुल, विष्णू शिंदे, प्रभाकर पगारे, भीमराव दोंदे, उत्तम शेलार आदी उपस्थित होते. चंद्रकांत मोरे यांनी आभार मानले.