
सुंदर ठाण्यासाठी सर्वांनी काम करावे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकारण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी ‘माझे ठाणे’ ही भावना मनात ठेवून ठाण्याच्या विकासासाठी उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे महापालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी नरेंद्र बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
मला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याची व राज्याची सेवा करण्याची संधी ठाणेकरांनीच दिली आहे. ठाणेकरांनी ठाण्याच्या विकासात पुढे येऊन योगदान देणे आवश्यक आहे. या ठाण्यावर बाळासाहेबांनी विशेष प्रेम केले आहे. बाळासाहेबांच्या काळातील दादोजी कोंडदेव स्टेडियम कात टाकत आहे. ठाण्यात भविष्याच्या दृष्टीने नवनवीन बदल होत आहेत. यामुळे ठाणेकरांना आधुनिक सेवा-सुविधा मिळत आहेत. ठाण्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पुढील चार महिन्यांत शंभर टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे होतील. सेवा रस्ते वापरात आणून मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
ठाणे शहराच्या स्वच्छतेबरोबरच ही स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपुलकीची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, की शहराच्या स्वच्छतेतील महत्त्वाचे योगदान असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी महापालिकेमार्फत करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. ठाणे शहराच्या विकासासाठी ६०५ कोटींचा निधी दिला आहे. राज्य सरकार व महापालिका निधी देईल; मात्र अधिकाऱ्यांनी दर्जात्मक कामे करावे. यामध्ये कुठलाही कसूर करू नये. विकास कामांना गती देण्याची क्षमता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात आहे. अधिकाऱ्यांनी त्या क्षमतेचा वापर करून विकास कामांना गती द्यावी, अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली.
खड्डेमुक्त ठाणे हा माझा जिव्हाळ्याचा विषय
दरवर्षी मुंबई, ठाण्यात खड्डे पडतात. हे चित्र बदलण्याच्या सूचना मुंबई आयुक्तांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी ४५० किमीचे रस्ते काँक्रीटचे करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी साडेपाच हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. येत्या काळात मुंबईतील सर्व रस्ते काँक्रीटचे होणार आहेत. त्यामुळे ठाणेदेखील खड्डेमुक्त झाले पाहिजे. यामध्ये १४२ किमीचे रस्ते दुरुस्त करण्याची योजना आखली असून येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण झाले पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाण्याचे आणि ठाण्यात खड्डे अशी टीका होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणेकरांवर आता ठाण्याची जबाबदारी
ठाण्याची चिंता तशी मला वाटत नाही; मात्र आता ठाण्याच्या लोकांनी ठाण्याकडे लक्ष दिले पाहिजे, कारण ठाणेकर हे सुज्ञ आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर माझी जबाबदारी वाढली असून आता मला केवळ ठाणे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.