
सुषमा अंधारे यांच्यावर राजू पाटील यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : मुलुंड येथील महाप्रबोधन यात्रेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ‘ऊठ दुपारी अन् घे सुपारी’ असा त्यांचा कार्यक्रम असतो, अशा शब्दांत टीका केली होती. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अंधारे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. आमच्याकडे एक सुशी ताई आहेत, ज्यांच्या ‘वरच्या मजल्यावर’ घनदाट ‘अंधार’ आहे, असे खडे बोल त्यांनी अंधारे यांना लगावले आहेत.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना राज यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली होती. अंधारे यांनी राज यांना उद्देशून म्हटले, की ‘आमच्याकडे एक असा माणूस आहे पठ्ठ्या... ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो. याला थोडं बोलेन, त्याला थोडं बोलेन, काही वेळासाठी विचारवंत होईल, मध्येच मिमिक्री कलाकार होईल असा त्यांचा कार्यक्रम असतो.’ अंधारे यांच्या या वक्तव्यानंतर मनसे आमदार यांनी एक ट्विट केले आहे. ‘वरचा मजला रिकामा’ असा मराठीत वाक्प्रचार आहे, परंतु आमच्याकडे एक सुशी ताई आहेत, ज्यांच्या ‘वरच्या मजल्यावर’ घनदाट ‘अंधार’ आहे. आपण कधी काळी कुणाविषयी काय बोललो होतो हे त्यांना बिलकूल आठवत नाही आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात, असे त्यांनी म्हटले आहे.