
मुंबईत कोणतीही जमावबंदी नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून कलम १४४ अंतर्गत जमावबंदी/ संचारबंदी लागू केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून झळकत आहे. यामुळे मुंबईत जमावबंदी लागू होणार, असे वातावरण तयार झाले होते. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज एक निवेदन जारी केले. यामध्ये शहरात जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही. शहरात जमावबंदी लागू झाल्याच्या अफवा खोट्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
बेकायदा मेळावे आणि रॅली टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी ३ ते १७ डिसेंबर या कालावधीत शहरामध्ये निर्बंध लागू केले आहेत, असे पोलिसांनी आदेशात सांगितले आहे. ‘ऑर्डर’ ही एक नियमित प्रक्रिया असून त्या प्रक्रियेचे दर १५ दिवसांनी पुनरावलोकन केले जाते. या मुद्द्यावर पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला. मुंबईत कोणत्याही ठिकाणी ‘कर्फ्यू’ नाही. मुंबईकरांनी अफवांवर विश्वास ठेवू नये जेणेकरून गैरसमज निर्माण होईल, असे नांगरे-पाटील यांनी संदेशातून सांगितले.