स्वागत कमानीची लादी पडून बालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वागत कमानीची लादी पडून बालकाचा मृत्यू
स्वागत कमानीची लादी पडून बालकाचा मृत्यू

स्वागत कमानीची लादी पडून बालकाचा मृत्यू

sakal_logo
By

भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : शहरातील महापालिका शाळेसमोर असलेल्या स्वागत कमानीची लादी कोसळून चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी भिवंडीतील नारपोली येथे घडली. आयुषकुमार कुशवाह असे या बालकाचे नाव आहे. स्वागत कमानीवरील अनेक लाद्या निखळून पडल्या आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याने संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

नारपोलीतील न्यू टावरे कम्पाऊंड येथे पालिका शाळा क्र. ७२ समोर स्वागत कमान आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजता आयुषकुमार तेथे खेळत असताना कमानीवरील संगमरवरी लादी अचानक आयुषकुमारच्या डोक्यावर पडली. या घटनेनंतर बेशुद्ध झालेल्या आयुषला त्याची आई शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेली; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेबाबत महापालिका प्रशासन अनभिज्ञ होते. घटनेनंतर चार तास पालिका प्रशासनाकडून घटनास्थळी कोणी फिरकले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
स्वागत कमान १४ वर्षांपूर्वी बनवण्यात आली असून त्यावरील अनेक लाद्या निखळून पडल्या आहेत. या कमानीसमोर शाळा असल्याने अपघात घडू शकतो याबाबत शाळेच्या शिक्षकांसह स्थानिक माजी नगरसेवक भगवान टावरे यांनी पालिकेकडे तक्रार करून लाद्या काढून टाकण्याची मागणी केली होती; परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. याला पालिका जबाबदार असल्याचा आरोप टावरे यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित पालिका अभियंता आणि प्रभाग समिती ४ च्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.