प्रिमिअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रिमिअर
प्रिमिअर

प्रिमिअर

sakal_logo
By

‘फू बाई फू’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

एक काळ होता जेव्हा नुसते मराठी मालिका म्हटले तरी प्रथम ‘झी मराठी’ या वाहिनीचेच नाव डोळ्यांसमोर येत असे. फक्त मराठी भाषिक नाहीत तर इतर अमराठी प्रेक्षकांनाही या वाहिनीबद्दल खूप आपुलकी आणि प्रेम वाटायचे; परंतु गेल्या काही वर्षांच्या निरीक्षणावरून वाहिनीला आपला हा दर्जा टिकवता न आल्याचे दिसून येत आहे. याचाच परिणाम झी मराठी वाहिनीवर नव्याने सुरू झालेल्या ‘फू बाई फू’ या कार्यक्रमावरसुद्धा झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे.
‘फू बाई फू’च्या आधीच्या सर्व पर्वांना विनोदविरांमुळे प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. म्हणूनच निर्माते आणि वाहिनीने तब्बल ९ वर्षांनंतर या कार्यक्रमाच्या पुढच्या पर्वाचीही घोषणा केली. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘फू बाई फू’चे नवे पर्व सुरू करण्यात आले. निर्मिती सावंत आणि उमेश कामत हे परीक्षकांच्या खुर्चीत होते, तर वैदेही परशुरामी ही निवेदक म्हणून प्रथमच प्रेक्षकांसमोर आली होती.
‘जिथे असाल तिथे हसाल’ म्हणत फारच उत्साहात या नव्या पर्वाची सुरुवात करण्यात आली. सागर कारंडे, ओंकार भोजने, पंढरीनाथ कांबळे, माधवी जुवेकर अशा अनेक विनोदाच्या बादशहांना घेऊन या नव्या पर्वाचा प्रवास सुरू झाला. इतक्या वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या या नव्या पर्वाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या; परंतु आधीच्या पर्वांच्या तुलनेत हे नवे पर्व प्रेक्षकांच्या तितकेसे पसंतीस पडलेले नाही असे दिसून येत आहे. अनेक पर्व गाजवलेच्या या कार्यक्रमाला अपेक्षित असा टीआरपी न मिळाल्याने येत्या ८ डिसेंबर रोजी ‘फू बाई फू’चा शेवटचा एपिसोड चित्रित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

................
‘हर हर महादेव’चा वाद पुन्हा पेटणार?

या वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढून घोषणाबाजी करत नागरिकांनी या चित्रपटाला चांगलाच विरोध दर्शवला. त्यामुळे या चित्रपटाचे थिएटरमधील शोसुद्धा रद्द करण्यात आले होते. या चित्रपटावर छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी आक्षेपार्ह आणि चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप होता. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही चित्रपटावर बहिष्कार टाकत निषेध दर्शविला होता.
असे असतानाच १८ डिसेंबर रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी मराठी वाहिनीवर होणार असल्याची घोषणा वाहिनीने सोशल मीडियावर केली. चित्रपटात शरद केळकर याने साकारलेल्या ‘बाजी प्रभू देशपांडे’ यांच्या भूमिकेची छोटीशी झलक दाखवत ‘महाराष्ट्राच्या घरोघरी गर्जणार स्वराज्याची डरकाळी’ अशी कॅप्शनसुद्धा देण्यात आली आहे; परंतु आता हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित होण्यावरही छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे चित्रपटावरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

..............
‘कब्जा’च्या टिझरचा नवा विक्रम

‘कब्जा’ या मूळ कन्नड भाषेतील चित्रपटाचा हिंदी टिझर १ डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. ‘कब्जा’ हा चित्रपट अमरेश्वर या एका शूर स्वातंत्र्यसैनिकासंदर्भात आहे, ज्यांचा मुलगा त्यांच्यानंतर अंडरवर्ल्डचा राजा बनला होता. चित्रपटाच्या टिझरनेच एक नवा विक्रम केलाय असे म्हणता येईल. टिझर लाँच झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत टिझरने ७.५ दशलक्ष व्ह्युज पार केले होते.
‘कब्जा’चे दिग्दर्शक आर. चंद्रू असून उपेंद्र राव, किच्चा सुदीप आणि श्रिया सरन हे कलाकार चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात १९६०-१९८४ दरम्यानचा काळ उभा करण्यात आला आहे. हा चित्रपट तेलगू, तमीळ, हिंदी, मल्याळम, बंगाली, मराठी आणि उरिया या सर्व भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. प्रेक्षकांना चित्रपटाची विशेष उत्सुकता आहे, कारण याआधी कन्नडमध्ये कोणताच चित्रपट सात भाषांमध्ये प्रदर्शित झाला नव्हता.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २५ डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. निर्माते आनंद पंडित यांनी ट्विटरवर कब्जाचा टिझर शेअर करत लिहिले आहे, ‘‘पहिली झलकच सारे काही सांगते आहे!.. लवकरच भारतीय चित्रपटसृष्टीतील एका खूप मोठ्या गोष्टीचे साक्षीदार व्हा.’’ चित्रपटाच्या टिझरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक नवा उच्चांक गाठेल यात काही शंकाच नाही.