
कसारा-मोखावणे ग्रामपंचायत गुन्हेगारांवर वॉच ठेवणार
खर्डी, ता. ४ (बातमीदार) : गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोखावणे-कसारा ग्रामपंचायत प्रशासनाने सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, महिनाभरात ही यंत्रणा उभारली जाणार असल्याची माहिती सरपंच प्रकाश वीर यांनी दिली आहे.
कसारा पोलिस, व्यापारी, राजकीय पक्ष व संघटना यांच्या माध्यमातून मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात आलेले कॅमेरे विद्युत पुरवठ्याअभावी सध्या बंद असल्याने अनेक गुन्ह्यांचा शोध घेणे पोलिसांना अडचणीचे ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून रविवार आठवडे बाजारातील चोरीचे वाढते प्रमाण, दुचाकी वाहने चोरी, दुकान व घरफोडी अशा घटना वारंवार घडत असतात. या चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरात महत्त्वाच्या रहदारी व गर्दीच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज निर्माण झाली होती व तशी नागरिकांचीही मागणी जोर धरू लागली होती.
गावातील सार्वजनिक ठिकाण, मुख्य रस्ते, महापुरुषांचे स्मारक आणि विभागातील मुख्य ठिकाणी ही यंत्रणा उभारली जाणार असून, यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाचा सल्ला घेतला जाणार आहे. गावातील गुन्हेगारी, अपघातांच्या पार्श्वभूमीवर गावात सीसी टीव्ही कार्यान्वित असणे आवश्यक आहे.
बैठकीत निर्णय
सीसी टीव्हीच्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांची उकल होण्यासही मदत होणार असल्याचे सरपंच प्रकाश वीर यांनी सांगितले आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी डी. एन. पाकळे, सरपंच प्रकाश वीर, उपसरपंच शरद वेखंडे आणि सर्व प्रभाग सदस्य यांच्या विशेष बैठकीत सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.