दिव्यांग दिनी विशेष मुलांचा कलाविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग दिनी विशेष मुलांचा कलाविष्कार
दिव्यांग दिनी विशेष मुलांचा कलाविष्कार

दिव्यांग दिनी विशेष मुलांचा कलाविष्कार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ५ : व्यंगत्वावर मात करीत आपल्यातील कलागुण सादर करून विशेष मुलांनी उपस्थित रसिकांनाही त्यांच्या तालावर ठेका धरायला लावला. निमित्त होते जागतिक दिव्यांग दिनाचे! ठाणे महापालिका, आदित्य प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दिव्यांग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा या विशेष शाळेतील, तसेच ठाणे महापालिका हद्दीतील विविध विशेष शाळांमधील दिव्यांग मुले सहभागी झाली होती. यावेळी उपायुक्त वर्षा दीक्षित, समाजविकास अधिकारी दशरथ वाघमारे, दिव्यांग कला केंद्राचे किरण नाकती, संध्या नाकती, जिद्द शाळेच्या संचालिका अर्चना शेट्ये आदी उपस्थित होते. यावेळी ठाणे महापालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित यांनी महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना जोशी यांनी केले.

रसिक मंत्रमुग्ध
आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत ‘हम होंगे कामयाब’ या विशेष मुलांचा कलाविष्कार रसिकांना पाहावयास मिळाला. या कार्यक्रमावेळी दृष्टिहीन वादकांनी गाण्यांना साथ संगत केली. खेळताना रंग बाई होळीचा, मी हाय कोली अशा एकापेक्षा एक बहारदार नृत्यावर दिव्यांग मुलांनी ठेका धरला. विविध विशेष शाळांमधील मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली. तसेच दृष्टिहीन गायक-गायिकांनी अवीट गोडीची गाणी सुरेल आवाजात गात रसिकांना मंत्रमुग्ध केले.