कल्याणमध्‍ये मोठ्या वाहनांना प्रवासी बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्‍ये मोठ्या वाहनांना प्रवासी बंदी
कल्याणमध्‍ये मोठ्या वाहनांना प्रवासी बंदी

कल्याणमध्‍ये मोठ्या वाहनांना प्रवासी बंदी

sakal_logo
By

कल्याण, ता. ४ (बातमीदार) : कल्याण स्टेशनजवळील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत विविध प्रकल्प कामे सुरू असून त्याला गती देण्यासाठी परिसरात सोमवार (५ डिसेंबर)पासून कल्याणबाहेर जाणाऱ्या मोठ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या एनएमएमटी, केडीएमटी आणि एसटी बसला बंदी घालण्यात येणार आहे. त्‍यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला ताण पडणार असून सरकारी यंत्रणा याबाबत काय नियोजन करणार याकडे लक्ष लागले आहे.

कल्याण पश्चिम रेल्वेस्थानक परिसरात स्मार्ट सिटी कामे पूर्ण करण्यासाठी, तसेच परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी शुक्रवारी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात महत्त्‍वपूर्ण बैठक झाली. यात काही महत्त्‍वाचे निर्णय घेण्यात आले.
----------------------------
सुधारित व्‍यवस्‍था...
शहापूर, भिवंडी, ठाणे, मुरबाड, मुंबई आणि राज्यातील अन्य डेपोंच्या एसटी बस कल्याण एसटी डेपोमध्ये न येता दुर्गाडी आणि मुरबाड रोडवरील केडीएमटी गणेश घाट येथून सोडण्यात येणार आहेत.

पुणे, कोकणामधून येणाऱ्या बस गुरुदेव हॉटेल येथे प्रवासी उतरून पुढे मुरबाड रोडवरील केडीएमटी गणेश घाटकडे जातील. मात्र, याच ठिकाणी केडीएमटी बस थांबा असल्याने त्या बसही धावणार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार असून दुसरीकडे गावाला जाणाऱ्या प्रवाशांना या बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

एसटी डेपोपासून अन्य वाहनाने दुर्गाडी, गणेश घाट आणि गुरुदेव हॉटेलजवळ जाताना खिशाला ताण द्यावा लागणार असून, रिक्षाचालकांच्या लुटमारीपासून प्रवाशांना आरटीओ, वाहतूक पोलिस कसे वाचवणार याकडे लक्ष लागले आहे.
-------------------------------------------------
केडीएमटी आणि एनएमएमटी बस सेवा
केडीएमटी आणि एनएमएमटीच्या बसमधून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या बस रेल्वेस्थानक परिसरामध्ये न येता त्या दुर्गाडी किल्‍ल्‍याजवळील गणेश घाट येथून सुटतील. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून स्टेशन ते गणेश घाटापर्यंत मिनी बस सोडण्यात येणार असल्‍या तरी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

रिक्षाचालक ऐकतील का ?
कोंडी फोडण्यासाठी रिक्षाचालकांनी दोन रांगा लावाव्‍यात. त्यातील एक मीटर पद्धतीने आणि एक शेअर पद्धतीने धावणाऱ्या रिक्षांची रांग असणार असल्याची घोषणा पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केली असली तरी अनेक वर्षांपासून रिक्षा मीटर पद्धतीने धावत नसल्याने एका दिवसात हे रिक्षाचालक सुधारतील का, असा सवाल केला जात आहे.

नागरिकांना मनस्ताप
वाहतूक पोलिस आणि आरटीओकडे अगोदरच मनुष्यबळ कमी असल्याने, पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जाहीर केलेल्या पर्यायी व्यवस्था यशस्वी होतील का, रिक्षाचालकांची दादागिरी आणि प्रवासी वर्गाची लुटमार थांबेल का, याला प्रवासी वर्गाकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, यामुळे आगामी चार महिने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार असून खिशाला ताण ही द्यावा लागणार आहे.