
शेतकऱ्यांच्या बोनससाठी प्रयत्न करणार
सरळगाव, ता. ४ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या मागील दोन वर्षांच्या बोनससाठी शासनाकडे प्रयत्न करणार, असे आश्वासन माजी आमदार गोटीराम पवार यांनी दिले. मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघ मुरबाडच्या वतीने केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत भात खरेदी योजना २०२२-२३ अंतर्गत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
ठाणे जिल्ह्यातील धान (भात) उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मागील दोन वर्षे सहानुग्रह अनुदान राज्य शासनाने दिलेले नाही. त्यासाठी मुरबाड, शहापूर, कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वर्षी मुरबाड केंद्रात ४३५८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून जाड्या भरड्या धानाला केंद्र शासनाकडून प्रती क्विंटल २०४० रुपये भाताला हमीभाव मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सात-बारावर २०२२- ई पीकपेरा पाहणी नोंद केली असेल, त्याच शेतकऱ्यांचे भात केंदावर घेतले जाईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी हनुमंत पवार यांनी सांगितले. या वर्षी शेतकऱ्यांना भात खरेदी हमीभावाचे पैसे लवकरात लवकर मिळवून द्यावे, अशा सूचना माजी आमदार गोटीराम पवार यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.
याप्रसंगी संघाचे चेअरमन किसन गिरा, माजी चेअरमन पांडुरंग कोर, रामभाऊ दळवी, प्रकाश पवार, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत सासे, शिवसेना तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, मधुकर मोहपे, चंद्रकांत बोष्टे, व्हाईस चेअरमन जयवंत हरड, मोहन भावार्थे, संचालक मंगल केणे, चंद्रकांत रसाळ, तातू भोईर, विद्याताई चौधरी, व्यवस्थापक रमेश घागस तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. प्रकाश पवार यांनी आभार मानले.