विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात
विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात

विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात

sakal_logo
By

भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहराचा नुकताच प्रसिद्ध झालेला प्रारूप विकास आराखडा विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्‍यात सापडला आहे. या आराखडा केवळ वातानुकूलित कार्यालयात बसून तयार करण्यात आला असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. आता या आराखड्यावर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. तर आतापर्यंत या आराखड्यावर चार हजारांहून अधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
ऑक्टोबर महिन्यात शहराचा नवा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. या आराखड्यावर हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत नुकतीच संपली आहे. या कालावधीत तब्बल चार हजाराहून अधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. या प्रारूप आराखड्यात अनेक त्रुटी असल्याची टीका सुरुवातीपासूनच करण्यात येत होती. आता राजकीय पक्षांनी देखील त्यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. या आराखड्यामुळे मिरा-भाईंदर शहराचे भविष्य अंधकारमय असल्यामुळे हा आराखडाच रद्द करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केली असून या आराखड्याविरोधात आंदोलन सुरू करण्याचा इशारा मेहता यांनी दिला आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी देखील विकास आराखड्यात आवश्यक असलेल्या आरक्षणाबाबत सूचना केल्या आहेत. मिरा-भाईंदर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने शहराचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे नमूद करून हुसेन यांनी प्रशासनाला या सूचना दिल्या आहेत. शहरातील विविध अंतर्गत रस्ते तीस मीटर रुंद असावेत, नगरपरिषद काळातील इमारतींचा पुनर्विकास करताना त्या लगतचे रस्ते किमान बारा मीटर रुंद असावेत, वाढणाऱ्‍या वाहनांची संख्या व वाहतूक कोंडी लक्षात घेऊन ठिकठिकाणी वाहनतळ उभारावेत, गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी चार जागा हेलीपॅडसाठी आरक्षित कराव्यात, मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ अत्याधुनिक ट्रामा रुग्णालय असावे, मोर्वा गावाजवळील कारशेडचे आरक्षण रद्द करून ते गोराईला स्थलांतर करावे, उत्तन येथील वादग्रस्त कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करून ते आरक्षण शहराबाहेर द्यावे अशा विविध सूचना हुसेन यांनी केल्या आहेत. त्याच प्रमाणे आमदार गीता जैन यांनी देखील शहरात आवश्यक असलेल्या विविध आरक्षणांची मागणी करणारे पत्र संबंधित विभागाला दिले आहे.

काय आहेत आक्षेप?
मुळात शहराचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार मिरा-भाईंदर महापालिकेचा असताना तो तयार करण्याचे काम शहराबाहेरील अधिकाऱ्‍यांना दिले आहे. त्यामुळे त्यात असंख्य त्रुटी आहेत, असा आक्षेप मेहता यांनी घेतला आहे. आराखड्यात शहरातील अनधिकृत इमारती तसेच अतिरिक्त चटई क्षेत्रफळाचा वापर झालेल्या इमारतींसंदर्भात कोणताही तोडगा नाही, अनेक ठिकाणचे ना विकास क्षेत्र हटवून त्याठिकाणी रहिवासी क्षेत्र करण्यात आले आहे, ही बाब चांगली असली तरी मिळणाऱ्‍या अतिरिक्त चटई क्षेत्रफळामुळे शहराची लोकसंख्या बेसुमार वाढणार आहे, मूळच्या विकास आराखड्यातील अनेक आरक्षणे रद्द करून त्याठिकाणी नवी आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत आणि हे काम विकसकांच्या संगनमताने झाले आहे. शहराला नव्या आरक्षणांची आवश्यकता होती, मात्र त्यांचा आराखड्यात समावेश नाही अशा अनेक त्रुटींवर नरेंद्र मेहता बोट यांनी ठेवले आहे.

‘काम महापालिकेला द्यावे’
विकास आराखडाच रद्द करण्यात येऊन नवा विकास आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेला देण्यात यावे अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी १२ डिसेंबरला भाईंदर पश्चिम येथील बावन जिनालय मंदिरापासून महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मेहता यांनी दिली. तर दुसरीकडे विकास आराखड्याविरोधात दाखल झालेल्या हजारो हरकती व राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिका लक्षात घेऊन विकास आराखड्यात आता कोणते बदल करण्यात येणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.