
जिजाऊ शाळेत दिव्यांग दिन साजरा
विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यातील झडपोली येथील जिजाऊ अंध व मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यात लुई ब्रेल व हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील मुलींनी स्वागतगीत व ईशस्तवन गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक महेश गायकवाड यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी जिजाऊ अंध मुलांची निवासी शाळा झडपोली व दिव्य विद्यालय जव्हार येथील मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत जिजाऊ अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तसेच भावनादेवी भगवान सांबरे कनिष्ठ महाविद्यालय झडपोली येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शन नेमके काय असते ते समजून घेत शिक्षकांकडून मुलांनी अनेक संकल्पना समजावून घेतल्या. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.