विद्यार्थी वाहतूकदारांची संपाची हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी वाहतूकदारांची संपाची हाक
विद्यार्थी वाहतूकदारांची संपाची हाक

विद्यार्थी वाहतूकदारांची संपाची हाक

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ४ (वार्ताहर) ः पनवेल परिसरातील स्कूल व्हॅन परवाना नूतनीकरण आणि शाळा व्यवस्थापन संमती पत्राच्या मुद्द्यावरून ७०० पेक्षा जास्त स्कूल व्हॅन चालकांनी मंगळवारी (ता. ६) संप पुकारला आहे. या आंदोलनामुळे २५ हजार विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पनवेल विद्यार्थी वाहक संस्था आणि इतर स्कूल व्हॅनमध्ये जवळपास २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर, करंजाडे या परिसरात मोठ्या संख्येने स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांना ने-आण केली जाते. रिक्षांमधील विद्यार्थी वाहतूक बंद करून १४ वर्षांपूर्वी ओमनी व्हॅनला परिवहन विभागाने परवानगी दिली. तीन-चार वर्षांपूर्वी १३ प्लस आसन असणाऱ्या मिनी बसने विद्यार्थ्यांना ने-आण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ओमनी स्कूल व्हॅनला विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी परवाना नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी परिवहन विभागाने शाळांचे संमती पत्र बंधनकारक केले आहे. राज्य सरकारने तसे आदेश दिले असतानाही स्कूल व्यवस्थापनाकडून अशा प्रकारचे पत्र देण्यास टाळाटाळ होत आहे, तर दुसरीकडे परिवहन विभागाकडून अनेक विद्यार्थी वाहकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेने ६ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
---------------------------------------
संमती पत्राअभावी नूतनीकरण रखडले
परिवहन कार्यालयाकडून शाळांचे संमती पत्र बंधनकारक करणे केले आहे. मात्र, शाळा हे पत्र देण्यासाठी तयार नसल्याची स्थिती आहे. परिवहन समितीच्या बैठकीत शाळांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्याकडून सहकार्याची भूमिका घेतली जात नाही. शिक्षण विभागाकडूनही त्यांना आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. आरटीओ कार्यालयांकडूनही समन्वय साधला जात आहे. तरीसुद्धा शाळा स्कूल व्हॅन नूतनीकरणासाठी संमती पत्र देत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
--------------------------------------
मुलांना शाळेत पाठवायचे कसे!
पनवेल तालुक्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी स्कूल व्हॅनने शाळेत जातात आणि येतात. मात्र, परवाना नूतनीकरण होत नसल्याने विनापरवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करावी लागते. ६ डिसेंबरपासून स्कूल व्हॅन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे कसे, असा प्रश्न पालकांना पडला आहे.
-----------------------------------
आरटीओकडून शाळांचे संमती पत्र बंधनकारक करण्यात आले आहे. परवाने नूतनीकरणाच्या अनुषंगाने आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र, शाळा व्यवस्थापनाकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे उपोषण आणि सेवा बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
- पांडुरंग हुमणे, संस्थापक अध्यक्ष, पनवेल विद्यार्थी वाहक संस्था