
खड्डेमुक्तीच्या दिशेने ठाण्याचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : शहराचा चेहरामोहरा बदलताना एकाही रस्त्यावर खड्डा पडता कामा नये यासाठी ठाणे पालिका प्रशासन कामाला लागले आहे. त्यासाठी नगरविकास विभागातून मिळालेल्या २१४ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील एकूण १२७ रस्त्यांची कामे हातात घेतली आहेत. यामध्ये १२ रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ३४ रस्त्यांचे डांबरीकरण तर तब्बल ८१ रस्ते युटीडब्ल्यूटी या हायटेक प्रणालीने बांधण्यात येणार आहेत. रस्ते दुरुस्तीची ही कामे करताना ज्या रस्त्यांवर वर्षानुवर्षे खड्डे पडतात त्यांचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे खड्डेमुक्तीच्या दिशेचा हा प्रवास गाठण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सहा महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे या कालावधीत तयार होणारे रस्ते दर्जेदार असणार की ठाणेकरांच्या नशिबी पुन्हा खड्डेमय प्रवास येणार हे येत्या पावसाळ्यात उघड होईल.
मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. टोलजंग इमारती उभ्या राहत असताना येथील लोकसंख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. साहजिकच वाहनांच्या वर्दळीचे प्रमाणही त्याच पटीने वाढले आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहने यांचा विचार करून गेल्या अनेक वर्षांपासून शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते रुंदीकरणाची मोहीम सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात रस्ते रुंद जरी झाले असले तरीही रस्त्यांवरील दुतर्फा पार्किंगमुळे शहरातील वाहतूककोंडी काही कमी होताना दिसत नाही.
कोपरी पुलाचे काम अत्यंत संथ गतीने
मुंबईकडून ठाण्यात प्रवेश करताच आनंद नगर टोल नाका पार करतांना प्रवाशांचा वेळ वाया जातो. एमएमआरडीएच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या दशकापासून कोपरी पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने पुढील सर्वच चौक वाहतूककोंडीत अडकतात. पावसाळ्यात त्यात भर पडते ती खड्ड्यांची. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले असले तरी शहरातील रस्त्यांवरचे खड्डेपुराण थांबायला तयार नाही.
खड्डेमुक्त रस्त्यांचा विडा
मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने महापालिकेने त्यांच्या संकल्पनेतील खड्डेमुक्त रस्त्यांचा विडा उचलला आहे. मात्र, खड्डेमुक्तीचा हा पहिला प्रयत्न नाही. २०२२ मध्ये पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडू नये यासाठी पालिकेच्या बजेटमध्ये रस्ते काँक्रिटीकरणासाठी ३० कोटी, रस्ते नूतनीकरण ३० कोटी, विकास आराखड्यातील रस्ते बांधणे ३० कोटी, यूटीडब्लूटी पद्धतीने रस्ते नूतनीकरणासाठी ३० कोटी खर्च करण्याची योजना होती. रस्त्यांच्या पुनपृष्टीकरणाकरता २५० कोटी तर खड्डे दुरुस्तीसाठी १० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले होते.
शहर खड्ड्यांनी ग्रासले
ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्याआधी झालेल्या शेवटच्या महासभेमध्ये शिवसेनेने नगरविकास खात्यामधून रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल २१४ कोटींचा निधी आणला होता. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी ६०० कोटींहून अधिक निधी पालिकेच्या हाती आला. पण त्यानंतर पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आणि पावसाळा सुरू झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात खड्ड्यांचा विषय गाजला. सत्तांतरणानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांचेच शहर खड्ड्यांनी ग्रासले. इतकेच नव्हे तर खड्ड्यांमुळे जिवीत हानीलाही सामोरे जावे लागले. त्यामुळे पावसाने काढता पाय घेताच पालिकेने सरकारकडून मिळालेल्या निधीतून रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली आहे.
१०३ किलोमीटर रस्ते टप्प्यात
दुरुस्तीची कामे हाती घेताना सर्वप्रथम प्राधान्य म्हणून खड्ड्यांचे हॉटस्पॉट असलेले रस्ते निवडले आहेत. त्याअंतर्गत शहरातील तिन्ही उड्डाणपुलाच्या चढण-उतरण, चौकातील रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्व नऊ प्रभाग समित्यांमधील ५२.८३० किमीचे १२७ रस्ते या उपक्रमांतर्गत दुरुस्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने रस्त्यांची यादी तयार केली आहे. त्यानुसार एकूण २७.७८७ किलो मीटर लांबीचे ३४ रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ८२.५९ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे तसेच नाले व सी. डी. वर्कच्या कामासाठी ३५ कोटी ७९ लाख रुपयांची तरतूद आहे. एकूण २,१०५ किमीच्या १२ रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ठाणे पालिकेने सर्वप्रथम शहरात आणलेल्या युटीडब्लूटी पद्धतीने ८१ रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे ९५ कोटी ६२ लाख रुपये खर्चून २२. ९३९ किमीचे रस्ते हायटेक बनणार आहेत.
दृष्टिपथातील दुरुस्ती
सॅटिस पश्चिम उड्डाणपुलासह शहरातील सर्व प्रमुख उड्डाणपुलाच्या रस्त्यांची दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील सर्व प्रमुख चौक रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तीन हात नाका परिसर, मनोरुग्णालय परिसर, वागळे मुख्य रस्ता, वागळे प्रभाग समिती कार्यालय ते एमआयडीसी कॉलनी, गोखले रस्ता, जांभळी नाका, कोपरी बारा बंगला परिसर, मुंब्रा देवी कॉलनी रस्ता, दिवा, आगासन, बेतावडी येथील रस्ते, दिवा शिळ रस्ता, वागळे मुख्य रस्ता, बाळकुम रस्ता, बाळकुम सेवा रस्ता, कळव्यातील भास्कर नगर, आत्कोनेश्वर नगर व घोलाई नगर, जिल्हा रुग्णालयाकडे जाणारा रस्ता, आगासन मुख्य रस्ता, इंदिरानगर साठे नगर रूपादेवी पाडा, नितीन कंपनी ते तारांगण सोसायटी सर्विस रस्ता, भटवाडी अंतर्गत रस्ता , घोडबंदरमार्ग आदी १२७ रस्त्यांची दुरुस्ती येत्या सहा महिन्यांत होणार आहे.