
कर्जतमध्ये ज्वेलर्स मालकाची निर्घृण हत्या
कर्जत, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यातील कशेळे येथील ज्वेलर्सच्या मालकाची धारदार शस्त्राने जिते गाव परिसरात शनिवारी (ता. ३) रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरीश राजपूत हे कल्याण तालुक्यातील ठाकुर्ली येथे राहण्यास होते. त्यांनी कशेळे गावाच्या मुख्य बाजारपेठेत राजेंद्र ज्वेलर्स या नावाने सराफी व्यवसाय सुरू केला होता. नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी ७ वाजता त्यांनी आपले दुकान बंद केले आणि घरी जाण्यासाठी नेरळ स्थानकावरून लोकल पकडण्यासाठी मोटरसायकलवरून निघाले होते. कशेळे ते नेरळ या मार्गावरील जिते गाव परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि त्यांची हत्या केली.
राजपूत रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यांच्या परतीच्या मार्गावर शोध घेतला असता जिते गाव परिसरातील रस्त्यालगत मोटरसायकल आढळून आली. त्याजवळच रस्त्यालगतच्या खड्ड्यात त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. ही हत्या नेमकी का करण्यात आली, याचा तपास नेरळ पोलिस करीत आहेत.
मोटरसायकलची तोडफोड
राजपूत यांची हत्या हा अपघात वाटावा, म्हणून त्यांच्या मोटरसायकलची हल्लेखोरांनी जाणीवपूर्वक तोडमोड केली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांचा आहे.