
एमआयडीसीतील रासायनिक सांडपाण्याची जलवाहिनी फुटली
बदलापूर, ता. ४ (बातमीदार) : शहरातील कात्रप परिसरात एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे रहिवासी भागातील रस्त्यावरून रासायनिक सांडपाणी वाहत आहे. या सांडपाण्याचा उग्र दर्प येत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
बदलापूर पूर्व परिसरातील एमआयडीसीत अनेक रासायनिक कारखाने व कंपन्या आहेत. त्यामध्ये तयार होणारे रासायनिक सांडपाणी हे प्रक्रिया करून अंबरनाथ एमआयडीसीतील नाल्यात सोडले जाते. त्यासाठी बदलापूर एमआयडीसीपासून अंबरनाथ एमआयडीसीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे; मात्र ही जलवाहिनी अनेकदा फुटत असल्यामुळे त्यातील सांडपाणी रस्त्यावर वाहताना पाहायला मिळते. आज (ता. ४) सकाळीही रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी ही जलवाहिनी कात्रप परिसरातच फुटली आहे. त्यामुळे त्यामधील रासायनिक सांडपाणी रहिवासी भागात वाहत असल्याने त्याला सुटणाऱ्या उग्र दर्पाचा सकाळपासूनच श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या अडचणीवर एमआयडीसी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.