प्रिमिअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रिमिअर
प्रिमिअर

प्रिमिअर

sakal_logo
By

‘राम सेतू’ आला ओटीटीवर
खिलाडी कुमार अक्षयचा ‘राम सेतू’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता; मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. १५० कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने शंभर कोटी रुपयेसुद्धा कमाई केली नाही. देशभरात तीन हजार स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाने केवळ ९२ कोटी रुपये इतकाच व्यवसाय केला होता. अक्षयबरोबरच जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरूचा आदी कलाकारांनी काम केले होते. अभिषेक शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे आणि तो पाहण्यासाठी १९९ रुपये मोजावे लागणार आहेत. हिंदीबरोबरच तमीळ आणि तेलगू या भाषांत तो प्रदर्शित झाला आहे. अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट आता पाहता येणार आहे.

.................
रोहित शिंदे बिग बॉसमधून बाहेर
कलर्स मराठीवरील बिग बॉस हा गमतीजमती आणि धमाल, मौजमस्तीचा खेळ! आता बिग बॉस मराठीच्या घरात चार जणांची एन्ट्री झाली आहे. त्यांच्या येण्याने खेळात धम्माल आणली आणि घरातील सदस्यांची नाती बदलताना दिसली. नव्या सदस्यांच्या घरात येण्याने खेळ बदलताना दिसत होता. या आठवड्यात चार नॉमिनेटेड झालेल्या सदस्यांपैकी म्हणजेच अपूर्वा, प्रसाद, रोहित आणि अमृता देशमुख यांच्यापैकी रोहित शिंदेला घराबाहेर पडावे लागले. मीरा, अक्षय, विशाल यांच्या मते अपूर्वा ठरली वजनदार. प्रसाद आणि रोहितमध्ये अक्षय, स्नेहलता, अपूर्वा, राखी, मीरा, अमृता देशमुख यांनी रोहितला वजनदार ठरवले; तर किरण, अमृता धोंगडे यांनी प्रसादला वजनदार ठरवले. अखेर रोहितला घराबाहेर पडावे लागले आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडताना रोहित काहीसा भावुक झाला होता. त्याने या घराला नमस्कार केला आणि तो बाहेर पडला. इतर सदस्यही त्याला निरोप देताना भावुक झाले होते.

...........
दिलजीतने सरकारबद्दल व्यक्त केली नाराजी
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची २९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये बरीच खळबळ निर्माण झाली होती. आता त्याच्या हत्येबाबत पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांज याने आपले मत मांडले आहे. दिलजीत म्हणाला, ‘‘हा शंभर टक्के सरकारचा दोष आहे. एक कलाकार कोणाचं काही एवढं वाईट करेल यावर माझा विश्वासच बसू शकत नाही. हे सर्व खूप वाईट असं राजकारण सुरू आहे. पंजाब पोलिसांनी ४२४ जणांची सुरक्षा काढून घेतली. यात सिद्धूची सुरक्षासुद्धा काढण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची हत्या झाली. अशा प्रकारे दिलजीतने पंजाब सरकारबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.

.............
मलायका अरोरा झाली भावुक
अभिनेत्री मलायका अरोराला ‘दिल से’ चित्रपटातील ‘छैया छैया’ या गाण्याने रातोरात स्टार बनविले. त्यानंतर तिने ‘अनारकली डिस्को चली’, ‘मुन्नी बदनाम हुई’ अशी काही आयटम साँग्ज करून लोकप्रियता मिळविली. डिसेंबर १९९८ मध्ये तिने अरबाज खानबरोबर लग्न केले. त्यानंतर २०१७ मध्ये ते दोघे विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाचे कारण ठरले अर्जुन कपूरबरोबर असलेल्या मैत्रीचे. अर्जुन कपूर आणि मलायका एकमेकाला डेट करीत आहेत असे बोलले गेले. आता ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे समजत आहे. आता मलायकाचा ‘मूव्हिंग इन विथ मलायका'' नावाचा धमाकेदार शो हॉट स्टारवर आला आहे. या शोचा एक नवा प्रोमो मलायकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ती तिच्या आयुष्यातील गोष्टींवर भरभरून बोलताना दिसत आहे. बोलताना ती कमालीची भावुक झाली आहे. दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानबरोबर बोलताना मलायका म्हणते, ‘‘मी माझ्या आयुष्यात घेतलेले सर्व निर्णय योग्य होते. आता माझे चाहते मला अधिक जवळून जाणून घेतील. या शोद्वारे मी माझ्या आणि माझ्या चाहत्यांमधील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करीन.’’

..............
रशियामध्ये प्रदर्शित होणार ‘पुष्पा : द राइज’
अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाने चांगली कमाई केली. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रसिकांची मने जिंकली. आता रशियातील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी हा चित्रपट प्रयत्न करीत आहे. निर्माते रशियामध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहेत. येत्या ८ तारखेला हा चित्रपट तेथे प्रदर्शित होईल. सध्या चित्रपटाचे कलाकार अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि टीम रशियामध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेले आहेत. तेथील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकलेले आहेत आणि आता हे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहेत. मॉस्कोमध्ये आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये या चित्रपटाचा विशेष प्रीमियर पार पडला. त्याला तेथील रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाची क्रेझ वाढत असतानाच, चाहते चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण या चित्रपटाची टीम ‘पुष्पा : द रुल’ या दुसऱ्या भागाची तयारी करत आहे.