
सोपारा खाडीपुलासाठी शिवसेनेचे साखळी उपोषण
विरार, ता. ५ (बातमीदार) : विरार-नायगाव पूर्वेकडील सोपारा खाडी पुलाचे काम तातडीने मार्गी लागावे, यासाठी वसई शिवसेनेतर्फे तीन दिवसीय साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मेया पुलाचे काम रखडल्याने त्याचा थेट फटका येथील सर्वसामान्य जनतेला बसत आहे. त्यामुळे पुलाचा प्रश्न येत्या दोन आठवड्यांत मार्गी लागावा, यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
नायगाव पूर्वमधील सोपारा खाडीवरील पूल गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. मात्र मे. सरवई आगार यांनी न्यायालयातून या कामाला ‘मनाई आदेश’ आणले असल्याने हे काम रखडले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागालादेखील वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मात्र या खाडी पुलाच्या कामासाठी अद्यापपर्यंत कोणतीच प्रक्रिया राबवण्यात येत नसल्याने परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख पंकज देशमुख व वसई तालुकाप्रमुख (ग्रामीण) जगन्नाथ म्हात्रे-तांडेल, राजाराम बाबर, जनार्दन म्हात्रे, किरण म्हात्रे, प्रेरणा नगरचे शाखाप्रमुख मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.