
कोपरखैरणेतून प्रवास कटकटीचा
घणसोली, ता. ५ (बातमीदार)ः स्वच्छ शहर असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई शहरातील रेल्वेस्थानकांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. शहरातील महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असलेल्या कोपरखैरणे रेल्वेस्थानकाबाहेर बेघरांमुळे गलिच्छ स्वरूप आले असून मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील मुंबई उपनगरी रेल्वेच्या स्थानकांपैकी एक असलेल्या कोपरखैरणेतून दररोज हजारोंच्या घरात प्रवासी प्रवास करतात. मात्र, या स्थानकाबाहेरील कचऱ्याच्या साम्राज्यामुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास कटकटीचा झाला आहे. स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पालापाचोळा, प्लास्टिकची पाकिटे, पदपथांवर गोण्यांचे ढीग लागले असून बेघरांच्या वावरामुळे अस्वच्छता झालेली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून रेल्वे प्रशासन आणि सिडकोचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
--------------------------------
कोपरखैरणे रेल्वेस्थानकाबाहेर असणारा कचरा, स्थानकात होणारी घाण या संदर्भात संबंधित विभागाला कळवण्यात येईल. या स्थानकांच्या स्वच्छतेकडे तातडीने लक्ष दिले जाईल.
- प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको
---------------------------------
कोपरखैरणे रेल्वेस्थानकात सर्वत्र अस्वच्छता असते. येथे मोठ्या प्रमाणात बेघरांचा वावर असून त्यांच्यामुळे स्थानकाला गलिच्छ स्वरूप आले आहे.
- मानसी माने, प्रवासी