
आर्थिक विवंचनेतून तरुणाची आत्महत्या
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : तुर्भे स्टोअर्सच्या शिवशक्ती नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने घराजवळ असलेल्या उच्च दाबाच्या इलेक्ट्रिक टॉवरच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. किरण घाडगे (२४) असे या तरुणाचे नाव असून आर्थिक विवंचनेतून आलेल्या नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
किरण घाडगे हा तरुण शिवशक्ती नगरमध्ये आई आणि मोठ्या भावासह राहत होता. एका खासगी कंपनीत तो हाऊस कीपिंगचे काम करत होता. किरणला दारूचे व्यसन होते. रात्री उशिरापर्यंत तो घराजवळ असलेल्या उच्च दाबाच्या इलेक्ट्रीक टॉवरखाली बसत होता. रविवारी रात्री किरण घरातून जेवण करून बाहेर निघून गेला होता. मात्र तो सकाळपर्यंत घरी न आल्याने त्याची आई त्याला शोधण्यासाठी सोमवारी सकाळी घराबाहेर पडली होती. यावेळी किरण उच्च दाबाच्या इलेक्ट्रिक टॉवरच्या अँगलला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवून दिला. किरणच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी त्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.