
भंगार विक्रेत्याचे झाडावर अतिक्रमण
घणसोली, ता. ५ (बातमीदार)ः विभागात दिवसेंदिवस भंगार विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढत आहे. अनेक ठिकाणी पदपथांवर भंगार विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून पदपथांवर जागा नसल्याने चक्क झाडावरच साहित्य लटकावल्याचे चित्र आहे.
घणसोली विभागात भंगार विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे पादचारी त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी भंगार विक्रेत्यांनी पदपथावर अतिक्रमण केल्याचे पाहायला मिळत आहे. घणसोली विभागात ही समस्या गंभीर होत असून आता भंगार विक्रेत्यांनी झाडावरदेखील अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. घणसोलीत सेक्टर १६ परिसरात दर्या राजा हॉटेलच्या बाजूला भंगाराचे दुकान आहे, या दुकानाच्या पत्र्याच्या मधून एक नारळाचे झाड वाढलेले आहे. या नारळाच्या झाडावर या विक्रेत्याने रिकामे तेलाचे, कचऱ्याचे डब्बे, प्लास्टिकचे कॅन अडकवून ठेवले आहेत. त्यामुळे भगांरमाफियांच्या या अतिक्रमणामुळे वृक्षप्रेमी नाराज आहेत.
------------------------------
झाडावर अतिक्रमण करणाऱ्या भंगार विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल
- संतोष शिल्म, अतिक्रमण अधिकारी