
महिला सबलीकरणासाठी बांबू उत्पादन प्रशिक्षण
वज्रेश्वरी, ता. ५ (बातमीदार) : येथील तीर्थक्षेत्र परिसरातील गुरुदेव सिद्धपीठ प्रेरित प्रसाद चिकित्सा, गणेशपुरी यांच्या पाठपुराव्याने आणि जिल्हा उद्योग केंद्र, पालघर पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या माध्यमातून बचत गटातील महिलांसाठी बांबू उत्पादन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. वसई तालुक्यातील शेवटचा आणि दुर्गम समजला जाणाऱ्या कळम्भोन येथील लेंडीपाडा येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
हे प्रशिक्षण शिबिर एक महिन्याच्या कालावधीत पार पडणार आहे. एक महिना चालणाऱ्या या प्रशिक्षणात बचत गटातील ४० महिलांना बांबूच्या विविध गृहोपयोगी आणि शोभेच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रसाद चिकित्सा गेली ३० वर्षे तानसा खोऱ्यामध्ये शाश्वत विकासासाठी प्रयत्न करीत आहे. महिलांची आर्थिक प्रगती होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून स्थानिक संसाधनांच्या आधारे उपजीविकेचे पर्याय त्यांना उपलब्ध करून देत आहे. तानसा खोरे हे नैसर्गिक संसाधनांनी युक्त असून विविध जंगली वनस्पतींनी समृद्ध आहे. यापूर्वीच ऑगस्ट महिन्यात प्रसाद चिकित्साने केंद्र पुरस्कृत अटल बांबू समृद्धी योजनेच्या अभिसरणातून इथल्या महिलांना बाल्कोवा, न्यूटन, टुलडा अशा उत्तम प्रजातींच्या बांबूच्या उतीसंवर्धित रोपांचे वाटप केले आहे.
या वेळी पालघरचे प्रकल्प अधिकारी धम्मपाल थोरात, मुख्य प्रशिक्षक मगन जाधव, मेढे वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम गोफनर, उपसरपंच राजेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी वेखंडे, पब्लिक रिलेशन व्यवस्थापक शिवप्रसाद राऊत, कल्याणदीप तसेच प्रसाद चिकित्साचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
.............................
प्रमाणपत्र व बँक कर्ज प्रकरणासाठीही सहकार्य
शासनामार्फत हे प्रशिक्षण महिलांसाठी मोफत आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थी महिलेला शासनाचे प्रमाणपत्र व एक हजार रुपये मानधनसुद्धा मिळणार आहे. महिनाभर यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे ३५ टक्के अनुदानासह बँक कर्जप्रकरणासाठीही सहकार्य करणार असल्याची माहिती धम्मपाल थोरात यांनी दिली. प्रसाद चिकित्साचे कार्यकारी व्यवस्थापक मिलिंद नरगुंद यांनी सांगितले, की एक महिना चालणाऱ्या या प्रशिक्षणाचे समन्वयन प्रासाद चिकित्साद्वारे होणार आहे. तसेच भविष्यात महिलांच्या आर्थिक विकासासाठी शासनाच्या सह्याने विविध प्रशिक्षणे घेण्याचे नियोजन आहे.