लग्नाच्या निमंत्रणाला महागाईची झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाच्या निमंत्रणाला महागाईची झळ
लग्नाच्या निमंत्रणाला महागाईची झळ

लग्नाच्या निमंत्रणाला महागाईची झळ

sakal_logo
By

जव्हार, ता. ५ (बातमीदार) : तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागात विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने आणि हायटेक निमंत्रणाद्वारे करण्याकडे अधिक कल आहे. सध्या सर्वत्र महागाईने डोके वर काढले आहे, त्यातच घरोघरी जाऊन नातेवाईकांना लग्नाचे निमंत्रण देण्याकरिता असलेली पद्धती काहीशी बदलत चालली आहे. अशात कागदासह प्रिंटिंग साहित्य दरामध्ये वाढ झाल्याने लग्नाचे निमंत्रण देणे महाग झाले आहे.
कागदाचे आणि इतर साहित्याचे भाव वाढल्याने लग्नपत्रिकेच्या खर्चात ३० ते ३५ टक्के वाढ झाली, मात्र असे असले तरी लग्नपत्रिका खरेदीसाठी यजमानांकडून घाई केली जात आहे. विशेष बाब म्हणजे लॉकडाऊन काळात लग्नपत्रिका खरेदीचा आकडा जेमतेम होता. आता मात्र त्यात मोठी भर पडल्याने जव्हार शहरातील व्यापारी वर्गही सुखावताना दिसत आहे.
लग्नपत्रिका अधिकाधिक आकर्षक करण्यावर भर दिला जात आहे. तुळशी विवाह होताच लग्नपत्रिका छपाईचा व्यवसाय तेजीत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. कागदाचे दर वाढले असल्याने यंदा लग्नपत्रिका महाग झाल्या आहेत. त्यामुळे वर-वधू पित्याला निमंत्रणासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
यंदा लग्नपत्रिकेचा कागद महाग झाला असून दिल्ली, अहमदाबाद, तामिळनाडू, शिवकाशी, राजकोट, इंदूर आदी ठिकाणांहून हा कागद येत असतो. जव्हार तालुक्यातील नागरिक लग्नपत्रिकेसाठी नाशिक, पालघर, उल्हासनगर या भागात जाऊन खरेदी करतात. दरम्यान, पारंपरिक पद्धतीने लग्नपत्रिका न छापता हटके आणि आकर्षक लग्नपत्रिका छापण्याचा ट्रेंड आहे.
...
फोटोसाठी आग्रह
लग्नपत्रिकेवर वधू-वराचा फोटो टाकण्याचा आग्रह धरला जात आहे. लग्नपत्रिकेवर सामाजिक जनजागृतीपर संदेशही दिला जात आहे, तर पत्रिकेत शेकडो नावांऐवजी मोजकीच नावे आणि पर्यावरणपूरक असलेली साधी लग्नपत्रिका छापायला प्राधान्य दिले जात आहे.
...
माझ्या मुलाचे लग्न असल्याने लग्नपत्रिका तयार करण्याच्या विचारात होतो. पत्रिका छापण्यासाठी गेलो असता वाढलेले दर पाहून मी पत्रिका छापण्याचे रद्द करून सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाचे आमंत्रण दिले आहे. पत्रिकेचा वाढलेला खर्च पाहून केवळ डिजिटल पत्रिका तयार करून घेतली आहे.
- सुरेश दिघा, वरपिता

दोन वर्षे कोरोना काळात हा व्यवसाय जेमतेम सुरू होता, पण या वर्षी लग्नसराईला पूर्वीप्रमाणे सुरुवात झाल्याने नागरिक लग्नपत्रिका खरेदी करत आहेत. या वर्षी कागदाचे भाव वाढल्याने पत्रिका अधिक महाग झाल्या आहेत.
- रोहित पाटील, व्यावसायिक, जव्हार