ग्रामीण भागात थायरॉइडचे प्रमाण वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागात थायरॉइडचे प्रमाण वाढले
ग्रामीण भागात थायरॉइडचे प्रमाण वाढले

ग्रामीण भागात थायरॉइडचे प्रमाण वाढले

sakal_logo
By

जव्हार, ता. ५ (बातमीदार) : जव्हार शहर तथा ग्रामीण भागात थायरॉईडचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे. सध्या तालुक्यातील १९१३ महिलांना थायरॉईडच्या समस्येने ग्रासले असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
महिला या नेहमी आपल्या घराकडे, घरातल्या सदस्यांची काळजी घेण्यात व्यस्त असतात. त्यामुळे त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. तालुका आरोग्य प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’त हे पुन्हा सिद्ध झाले आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील १९१३ महिलांना थायरॉईडसारख्या समस्येने गासल्याचे लक्षात आले.
थायरॉईडची नवीन समस्या शहरी व ग्रामीण भागात आढळून येत आल्याची माहिती समोर आली आहे. यात १९१३ महिलांपैकी ९४ महिलांमध्ये हायपोथायरॉईड आढळून आले आहे. २०२१ च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉईडचे ४.२ कोटी रुग्ण आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळेही हा आजार बळावत आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे.

थायरॉईड म्हणजे काय?
थायरॉईड ही एक लहान ग्रंथी मानेच्या खालच्या बाजूला असते. शरीराची चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवण्यासाठी थायरॉईड संप्रेरकांचे उत्सर्जन करत असते. जे शरीरातील पेशींना ऊर्जेचा वापर कसा करायचा ते सांगते. संप्रेरकांचे उत्सर्जन झाल्यानंतर त्याचा वापर शरीर करते. ही प्रक्रिया सतत सुरू राहते. जर ही प्रक्रिया बिघडली तर थायरॉईडचा त्रास बळावतो.

थायरॉईडची लक्षणे
वजन वाढणे, केस गळती, मासिक पाळी अनियमित येणे, चेहरा आणि डोळ्यांना सूज येणे, बद्धकोष्ठता.

थायरॉईड होण्याची कारणे
आयोडिनची कमतरता, औषधांचे दुष्परिणाम, ताणतणाव, आनुवंशिकता.
.....
बदलत्या जीवनशैलीमुळे व बदलत्या वातावरणामुळे आहारातील आयोडिनची कमतरता हे हायपोथायरॉईडचे प्रमाण वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. म्हणून गरोदरपणात पहिल्या ३ महिन्यांत थायरॉईड हार्मोनची तपासणी करून गरज असल्यास वेळेवर गोळ्या घेतल्यास बाळाची वाढ नीट होऊन कमी वजनाचे बाळ जन्माला येणे किंवा वेळेआधी प्रसूती होणे वगैरे गुंतागुंत टाळता येतात. यासाठी थायरॉईड तपासणी सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. तरी सर्व महिलांनी वेळीच सावध होऊन ही तपासणी करावी.
- डॉ. भरतकुमार महाले, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मोखाडा