
झोपडपट्टीनंतर उच्चभ्रू वस्तीत गोवरचा शिरकाव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईत कोविडनंतर झपाट्याने पसरलेला गोवर नियंत्रणात येण्यासाठी अजून काही महिने लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; मात्र आता आणखी चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील ‘एम पूर्व’ प्रभागामध्ये मर्यादित न राहता गोवर आता उच्चभ्रू वस्तीतही पसरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई शहरातील काही उच्चभ्रू प्रभागांमध्ये गोवर रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे.
मुंबईमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ पासून गोवरचा संसर्ग वाढू लागला. त्या वेळेस एकूण ८४ रुग्णांची नोंद झाली होती. याच काळात फक्त एम पूर्व विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते; मात्र आता १७ प्रभागांमध्ये गोवरच्या रुग्णांची नोंद होत आहे. सध्या यात काही उच्चभ्रू वसाहती असलेल्या प्रभागांचाही समावेश आहे. १५ नोव्हेंबरनंतर ई, एफ उत्तर, जी उत्तर, जी दक्षिण, ए आणि डी या प्रभागांमध्ये सध्या गोवरच्या रुग्णांची नोंद पालिकेने केली आहे.
दरम्यान, या प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक नोंदला गेला नसला तरीही रुग्णसंख्या नोंदवल्याने पालिकेने चिंता व्यक्त केली आहे. शहरातील ए, डी, ई, एफ उत्तर, जी उत्तर, जी दक्षिण या वॉर्डांपैकी ई वॉर्डात सर्वाधिक उद्रेक नोंदवण्यात आले आहेत. सुरुवातील ८४ असलेली रुग्णसंख्या दोन महिन्यांत ३८६ वर पोहोचली. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा गोवरची रुग्णसंख्या आणि त्यातून झालेल्या मृत्यूंची चार पट नोंद झाली आहे.
शहरातील उद्रेक असलेले विभाग
ए - २ उद्रेक
डी - १ उद्रेक
ई - ५ उद्रेक
एफ उत्तर - २ कमी उद्रेक
जी उत्तर - १ कमी उद्रेक
जी दक्षिण - २ कमी उद्रेक
मुंबईत उद्रेक झालेली ठिकाणे - ४६
सर्वाधिक उद्रेक असलेले प्रभाग
एम पूर्व - ७
एल १०
ई - ५
एच पूर्व - ४
एम पश्चिम- ३
..असा पसरला गोवर
- सुरुवातीला एम पूर्व प्रभागात गोवरचा प्रादुर्भाव सुरू झाला.
- १५ नोव्हेंबरनंतर ई, एफ उत्तर, जी दक्षिण, एल, एम पश्चिम, पी उत्तर, एच पूर्व
- २२ नोव्हेंबरनंतर जी उत्तर, के पूर्व प्रभागांमध्ये गोवरचे रुग्ण आढळले
- २३ नोव्हेंबरला एस, डी, ए, आर उत्तर, एफ उत्तर, एन, एस प्रभागांमध्ये रुग्ण
- २४ नोव्हेंबरला सी, के पश्चिम आणि टी या प्रभागांतही गोवरचे रुग्ण सापडले
- २६ नोव्हेंबरला आर मध्य, २८ नोव्हेंबरला बी वॉर्डमध्ये पहिला रुग्ण सापडला
उद्रेक म्हणजे काय-
ज्या भागांत दोनपेक्षा अधिक रुग्णांचे निदान गोवरसाठी निश्चित होते, तो उद्रेक असलेला भाग म्हणून घोषित केला जातो. म्हणजेच दोन गोवर असलेल्या रुग्णांची नोंद प्रयोगशाळा नोंदणीमध्ये निश्चित झाली की उद्रेक घोषित केला गेला.
------
गोवरवर दृष्टिक्षेप
गोवरचे एकूण रुग्ण - ३८६
गोवरचे निश्चित मृत्यू - ८
संशयित मृत्यू - ४
मुंबई बाहेरील मृत्यू - ३
बरे झालेले रुग्ण- ३०
व्हेंटिलेटर असलेले रुग्ण- २
विशेष मात्रा लसीकरण - १८८१३
सर्वेक्षण - २४२३२