
झोपडपट्टी मुक्तीकडे वाटचाल !
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अंदाजे ८३ हजार झोपड्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरातील या जागेवर चांगल्या दर्जाच्या व नीटनेटक्या गगनचुंबी इमारतींचे नियोजन सुरू आहे. पुणे-मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत झोपडपट्ट्यांचा कायापालट होणार असून त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील झोपड्यांचादेखील पुनर्विकास करण्याच्या अनुषंगाने समाजविकास विभागातर्फे लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरही भविष्यात झोपडपट्टीमुक्त होईल, असे संकेत मिळत आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. २००१ च्या सर्वेनुसार नोंदणीकृत झालेल्या ४२ हजार झोपड्या आहेत, पण कालांतराने यात वाढ होऊन तब्बल ८३ हजारांच्या घरात गेल्याचा अंदाज महापालिकेने वर्तवला आहे. अशातच भाजप सरकारने आणलेल्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गतही अशा झोपडपट्ट्यांच्या जागेवर इमारती उभारण्यास निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने या झोपड्यांचे सर्वे करून पंतप्रधान आवास योजना अथवा झोपु योजना राबवण्याचा विचार सुरू केला आहे, पण सरकारने काढलेल्या अधिसूचनेत ज्या सरकारी प्राधिकरणांच्या मालकीच्या जागेवर झोपडपट्ट्या आहेत, त्यांनाच सर्वेचा व पुनर्विकासाचा अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच्या या अधिसूचनेनुसार नवी मुंबई शहरात असणाऱ्या झोपड्या महापालिकेच्या मालकी हक्काच्या जागेवर नसल्याने पालिकेला सर्वे करण्याचा मार्ग बंद झाला होता; मात्र सर्वेक्षण होऊनसुद्धा फोटो पास न मिळाल्याने किमान फोटो पास देण्यासाठी सर्वेक्षण करण्याची ओरड झोपडपट्टीतील नागरिकांकडून करण्यात येत होती, पण २०११ ला राज्य सरकारने दिलेल्या नव्या निर्णयानुसार सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेने सर्वेक्षणाच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून सर्वेक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेने काही दिवसांपूर्वी पालिकेला सर्वेक्षणाचा नमुनाही सादर केला आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांचादेखील पुणे-मुंबईप्रमाणेच पुनर्विकास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------------------------------------------
असे होणार सर्वेक्षण
जीपीएस टॅग आणि उपग्रहद्वारे उपलब्ध होणाऱ्या नकाशावर तपासून झोपड्यांची नोंदणी केली जाणार आहे. त्याकरिता २००१ आणि २०११ चे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. सर्वेक्षण करण्याचा अनुभव पाहता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेने इच्छा व्यक्त केली आहे. त्याचे एक सादरीकरणही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
-----------------------------------------
२००१ च्या अपात्र झोपड्यांचे काय?
महापालिकेने २००१ ला झोपड्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार ४२ हजार झोपड्या हद्दीत असल्याची आकडेवारी नोंद झाली होती. त्यापैकी पात्र ठरलेल्या १९ हजार झोपड्यांना सध्या फोटो पास देण्याचे काम महापालिकेतर्फे सुरू होते, परंतु ते काम अलीकडेच थांबवण्यात आले आहे.
-----------------------------------------
झोपडपट्टींची एकूण संख्या - ४८ जागा
झोपडीधारक - ४१ हजार ८०५
एमआयडीसी भूखंड - २५ हजार १९
सिडको, शासकीय जागा - १६ हजार ७८६